पुणे : ही कसली शिवसंवाद यात्रा? कुठे आहे संवाद? पुण्यात येऊन पुण्याच्या प्रश्नांवर संवादाचा एक शब्दही नाही? फक्त उणीदुनी काढणे एवढाच या यात्रेचा उद्देश आहे का, असा सवाल मनसेचे प्रवक्ते योगेश खैरे (Yogesh Khaire) यांनी शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांना केला आहे. ते पुण्यात बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची शिवसंवाद यात्रा यावर टीका केली आहे. ही तर गद्दार शब्दाला समर्पित केलेली यात्रा दिसत आहे. आपल्या भाषणात आदित्य ठाकरेंनी तब्बल 40 वेळा गद्दार शब्द उच्चारला, असे टीकास्त्र योगेश खैरे यांनी सोडले. तर पुण्यात आल्यानंतर पुण्याच्या प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी बोलायला हवे होते. मात्र त्यांनी केवळ शिवसेनेतील (Shivsena) बंडखोरांवरच निशाणा साधला, असा हल्लाबोल योगेश खैरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरे सध्या राज्यभर दौरे करत आहेत. शिवसंवाद तसेच निष्ठा यात्रा अशी नावे देऊन त्यांच्या यात्रा सुरू आहेत. मात्र यात कुठला संवाद सुरू आहे, असा सवालच मनसेने विचारला आहे. शिवसंवाद यात्रेवर केवळ बंडखोरावंरच टीका होत आहे. बंडखोरांवर टीका करताना ते 40वेळा गद्दार म्हणाले. म्हणजे त्यांना गिनीज बुकमध्ये गद्दार शब्द जास्तीत जास्त वेळा म्हणण्याचे रेकॉर्ड करायचे होते का, असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत असल्याचे योगेश खैरे म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकीकडे बंडखोरांच्या मतदारसंघात दौरे काढून शक्तीप्रदर्शनात मग्न दिसत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांची शिवसंवाद यात्रा सुरू आहे. दोघांकडूनही आपल्यालाच प्रतिसाद मिळत असल्याचा दावा केला जात आहे. गद्दारांनी निवडणूक लढवावी, शिवसेनेचा वापर करू नये मग आपली जागा दिसून येईल, असा हल्ला आदित्य ठाकरे यानिमित्ताने करीत आहेत. आतापर्यंत कोकण, मराठवाडा आणि नुकतीच त्यांची यात्रा पुण्यात झाली, त्यावेळीदेखील त्यांनी शिवसेनेतील बंडखोरांची संभावना गद्दार, पळपुटे अशी केली. यावरून पुणे मनसेने त्यांच्यावर टीका केली आहे.