पुणे : पुण्यातील मनसेच्या (MNS) वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची आज बैठक आहे. 3 तारखेला पुणे शहरात वेगवेगळ्या ठिकाणी महाआरती होणार आहे. यासंबंधी दोन दिवसात पोलीस आयुक्तांना (Commissioner) निवेदन दिले जाणार आहे. 3 तारखेच्या महाआरतीवर मनसेची भूमिका आता जाहीर झाली आहे. राज ठाकरेंचा आदेश आमच्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी माहिती मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्याने टीव्ही 9 मराठीला दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दोन महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या. त्यावेळी 3 मेपर्यंत मशिदींवरचे भोंगे काढण्याचे अल्टिमेटम त्यांनी दिले होते, अन्यथा हनुमान चालिसा लावण्याचा इशारा दिला होता. त्याचवेळी त्यांनी हनुमान महाआरतीही केली होती. आता मनसेची यात पार्श्वभूमीवर बैठक आहे. यात विविध विषयांवर चर्चा होणार आहे.
17 एप्रिलला पुण्यात राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते म्हणाले होते, की आता रमजान सुरू आहे. मात्र 3 तारखेपर्यंत त्यांना समजले नाही, कायद्यापेक्षा, सुप्रीम कोर्टापेक्षा त्यांना स्वत:चा धर्म मोठा वाटत असेल तर जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. राज्यात, देशात दंगली भडकवण्याचा कोणताही हेतू नाही, कोणाच्याही प्रार्थनेला विरोध नाही. मात्र लाउडस्पीकर लावणार असाल, तर आमचीही प्रार्थना ऐकावी लागेल. लाउडस्पीकरवरून अजान दिवसांतून पाच-पाचवेळा होणार असेल तर आमचीही प्रार्थना दिवसांतून पाचवेळा ऐकावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे. सर्वांना सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.