पुणे : भोंगा विरुद्ध हनुमान चालिसा हा वाद सुरू असताना मनसेचे वसंत मोरे (Vasant More) यांच्याकडे मात्र हिंदू-मुस्लीम एकतेचे अनोखे चित्र पाहायला मिळाले आहे. आज संध्याकाळी वसंत मोरे यांनी हनुमानाच्या महाआरतीचे (Hanuman Maha-aarati) नियोजन केले असून त्याची तयारीही सुरू आहे. रियाझ शेख आणि निखिल खैरनार हे दोघे मिळून हनुमानाच्या मूर्तीला रंग देण्याचे काम करत आहेत. दरम्यान, राज ठाकरे पुण्यात आज आहेत. मात्र त्याची आपल्याला कल्पना नसल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले आहे. तर महाआरतीची परवानगी कालच मागितली असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या वाढदिवसाला जे 53 फुटी चित्र काढण्यात आले होते, त्यावेळीही कलाकार रियाझ शेखचा मोठा वाटा होता, बाबासाहेब पुरंदरेंचे कात्रजचे चित्रही याच कलाकारांनी काढल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले.
कायदा सुव्यवस्था राखून सर्व कार्यक्रम होतील. आजच्या महाआरतीला पोलिसांकडून रितसर परवानगी घेतली आहे. पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. त्यामुळे सर्व गोष्टी शांततेत कायद्यानुसार केल्या असत्या, तर शहरात शांतता राहिली असती, गनिमी कावा करून हनुमान आरत्या करायची गरज पडली नसली, असा टोलाच त्यांनी आपल्या पक्षातील विरोधकांना लगावला आहे. राज ठाकरेंनी आदेश दिला, त्यावेळी किती लोक मैदानात आले, असा सवाल त्यांनी केला. नियोजन कसे असावे, हे यानिमित्ताने दिसून येईल, असा टोला त्यांनी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना लगावला, ज्यांना त्यांनी अतृप्त आत्मे असे संबोधले होते.
आजच्या महाआरतीचा कार्यक्रम मी नेतृत्व करत असलेल्या प्रभागातील पदाधिकाऱ्यांसाठी आहे, शहरातील पदाधिकाऱ्यांसाठी नाही, असे स्पष्टीकरण वसंत मोरेंनी दिले आहे. राज ठाकरेंची आंदोलने महाराष्ट्राच्या हिताची नव्हती, तर सत्तेत राहून यांनी किती हित राज्याचे केले, असा टोला त्यांना अजित पवार यांना लगावला. आम्हाला काही कामे नाहीत, मग सत्तेत असून यांनी काय केले किंवा पुणे महापालिकेत भाजपाची सत्ता आहे, यावेळी राष्ट्रवादीने किती कामे केली, असा सवाल त्यांनी केला.