पुणे : अॅमेझॉनवरच्या वेबसाईटवर मराठी भाषेच्या समावेशाच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. पुण्यात मनसे अॅमेझॉन विरोधात आक्रमक झाली आहे. मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन पुण्यातील कोंढाव्यातील अॅमेझॉनचं ऑफिस मनसेने फोडलं आहे. मराठी भाषेला अॅमेझॉनच्या वेबसाइटवर स्थान द्यावे, अशी मागणी मनसेने केली होती. अॅमेझॉनने मराठी भाषेचा समावेश केल्यास मराठी लोकांना सोपे होईल आणि ते बेवसाइटवरून आवश्यक वस्तूंची योग्य निवड करू शकतील, असे मनसेचे म्हणणे होते. मात्र, अॅमेझॉनकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने मनसेने अॅमेझॉनविरोधात मोहीम हाती घेण्यात आलीय. (Pune MNS workers protest at Amazon Office for Marathi Language issue)
‘नो मराठी, नो अॅमेझॉन’
अॅमेझॉननं मनसेच्या मागणीला सकारत्मक प्रतिसाद दिला नसल्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी अॅमेझॉन विरोधात ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ मोहीम सुरु केली होती. मनसेचे पुण्यातील कार्यकर्ते आक्रमक झाले असून त्यांनी पुण्यातील कोंढवा मनसे प्रभाग अध्यक्ष अमित जगताप यांच्या नेतृत्वात अॅमेझॉनच्या कार्यालयावर खळखट्याक आंदोलन केले आहे.
अॅमेझॉनवर मराठी भाषेचा पर्याय उपलब्ध व्हावा, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सुरु केलेल्या मोहिमे अंतर्गत अॅमेझॉनविरोधात (Amazon) फलक लावण्यात आले आहेत. यावर ‘नो मराठी, नो अॅमेझॉन’ असा मजकूर लिहण्यात आला आहे. वांद्रे पूर्व, वांद्रे पश्चिम, माहीम, अंधेरी आणि रेक्लमेशनच्या परिसरातील रस्त्यांवर मनसेचे हे फलक पाहायला मिळत आहेत. मनसेचे नेते अखिल चित्रे यांच्याकडून हे फलक लावण्यात आले होते. यापूर्वी मनसेकडून अॅमेझॉनच्या मुंबईतील कार्यालयाबाहेर पोस्टर झळकावण्यात इशारा देण्यात आला होता. तुम्हाला महाराष्ट्रात आमची भाषा मान्य नाही. मग आम्हाला महाराष्ट्रात तुम्ही मान्य नाही, अशी तंबी मनसेने दिली होती.
राज ठाकरेंना नोटीस
मराठी भाषेवरुन सुरु केलेल्या मोहिमेवरुन अॅमेझॉनने कोर्टात धाव घेतली होती. त्यानंतर पाच जानेवारीला कोर्टात हजर राहण्याचे आदेश राज ठाकरेंना देण्यात आले आहेत. “अॅमेझॉनसारख्या प्रतिष्ठित कंपनीने एका चांगल्या लीगल फर्मला अपॉईंट करणं अपेक्षित होतं. पण एखाद्या मूर्ख वकिलाकडून त्यांनी ते लेटर ड्राफ्ट केलं आहे. त्यांनी जी नोटीस पाठवली आहे, त्याला काहीच अर्थ नाही. त्यांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवण्याचा जो प्रकार केला आहे, त्याची किंमत नक्कीच ॲमेझॉनला येत्या काळात मोजावी लागणार आहे” असा इशारा मनसेच्या अखिल चित्रे यांनी दिला होता.
संबंधित बातम्या:
Amazon vs MNS | राज ठाकरेंना नोटीस, कोर्टात हजर राहण्याचे आदेश
Amazon vs MNS | ॲमेझॉनला किंमत मोजावी लागेल, राज ठाकरेंना नोटिशीनंतर मनसे आक्रमक
(Pune MNS workers protest at Amazon Office for Marathi Language issue)