पुण्यात रात्रभर एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आहे. काल रात्री आठ वाजता सुरू झालेलं आंदोलन रात्रभर सुरूच आहे. रात्री आंदोलक विद्यार्थ्यांची संख्या वाढली होती. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्री आंदोलकांना सूचना दिल्या आहेत. मात्र विद्यार्थी 25 तारखेची परीक्षा पुढे ढकण्याच्या मागणीवर ठाम आहेत. MPSC ने आपली परीक्षा पुढे ढकलून त्यात 258 कृषी पदांचा समावेश करावा, अशी मागणी या आंदोलक विद्यार्थ्यांची आहे. तर त्याच दिवशी IBPS ची परीक्षा आहे त्यामुळे एका परीक्षेला विद्यार्थ्याला मुकावं लागेल. त्यामुळं ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी करत आहेत.
रात्री सव्वा एक वाजता पुण्यातील शास्त्री रोडवर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. पुणे सहपोलीस आयुक्त रंजन शर्मा हे एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलन करत असलेल्या शास्त्री रस्त्यावर गेले. त्यांनी विद्यार्थ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र विद्यार्थी आंदोलन मागे न घेण्यावर ठाम आहेत. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील मोठा पोलीस बंदोबस्त शास्त्री रस्त्यावर तैनात करण्यात आला आहे.
एमपीएससी आयोगाने रात्री सव्वा एक वाजता ट्वीट केलं. महाराष्ट्र कृषी सेवा संवर्गातील मागणी पत्राच्या अनुषंगाने गट अ आणि गट ब ची जाहिरात दोन दिवसात प्रसिद्ध करणार असल्याचं आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. या संवर्गातील पूर्व परीक्षाचे आयोजन ऑक्टोबरमध्ये करण्यात येईल. मात्र 25 तारखेला परीक्षा होणार आयोगाने आता जवळपास स्पष्ट केलं आहे.
काल रात्री 8 वाजता नवी पेठेतील लालबहादूर शास्त्री रस्त्यावर आंदोलक MPSC उमेदवार जमायला सुरुवात झाली. रात्री 9 वाजता नवी पेठेतील लालबहादूर शास्त्री रस्त्यावरील ICICI बँकेसमोर आंदोलन सुरू झालं. यावेळी पोलीस तिथे दाखल झाले. रात्री 11 वाजता एमपीएससी आंदोलकांची गर्दी वाढत होती. रस्यावर ठिय्या आंदोलन सुरु झालं. घोषणाबाजी सुरू झाली. रात्री साडे 11 वाजता शास्त्री रस्ता वाहतूकीसाठी दोन्ही बाजूंनी बंद आहे. रात्री 12 वाजता पुण्याचे सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आंदोलनस्थळी पोहचले. सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी यांनी एकत्र आंदोलनाचा आढावा घेतला. रात्री एक वाजता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून आंदोलकांना घरी जाण्याची विनंती करण्यात आली. रात्री दोन वाजता MPSC उमेदवार आंदोलनावर ठाम ठिय्या आंदोलन घोषणाबाजी सुरुच होती.