पुणे : महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पुण्यात आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारविरोधात राष्ट्रवादीने भोंगा आंदोलन केले. केंद्र सरकारने वाढवलेल्या जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भोंगा आंदोलन (Bhonga aandolan)करण्यात आले आहे. येथील गुडलक चौकात राष्ट्रवादीने भोंगा आंदोलन केले. वेगवेगळ्या प्रकारचे भोंगे यावेळी राष्ट्रवादीतर्फे लावण्यात आले. या भोंग्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषणही राष्ट्रवादीने लावल्याचे पाहायला मिळाले. पेट्रोल (Petrol) के दाम कम हुए की नहीं हुए? असे मोदी बोलत असल्याचे हे भाषण आपल्याला ऐकायला मिळते. एकीकडे पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडत आहे तर दुसरीकडे केंद्र सरकार यावर काहीही बोलायला तयार नाही, उलट विषय दुसरीकडेच नेऊन राजकारण सुरू आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला आहे.
देशात महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत. जनता एकीकडे हैराण झाली आहे. तर या सर्वांवरून लक्ष हटविण्यासाठी केंद्र सरकार योगी आदित्यनाथ, राज ठाकरेंसारख्यांना पुढे करत आहे. विषय भलतीकडेच नेण्याचा खटाटोप केंद्र सरकार करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केला आहे. भोंगे काढा भोंगे लावा सांगत जनतेला मूर्ख बनवण्याचा प्रकार सुरू आहे. म्हणून आम्ही आंदोलन करत आहोत. आम्हाला विकासाचा भोंगा हवा आहे, असे ते म्हणाले.
ज्या भोंग्यांवरून मोदी, योगी, राज ठाकरे राजकारण करत आहेत, त्याच भोंग्यांच्या माध्यमातून आम्ही मोदींची जुनी भाषणे ऐकवत आहोत. इंधनाचे दर कमी करण्याचे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या सरकारचा निषेध म्हणून हे आंदोलन करत असल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते, कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. केंद्र सरकारच्या विरोधात कार्यकर्त्यांच्या हातात फलक दिसत होते तर घोषणाबाजीही यावेळी करण्यात आली.