राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना मानतात. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर चालतात. शरद पवारांना शवंतराव चव्हाण यांचे राजकीय वारसदार म्हटलं जातं. याचा दाखला देत राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याने थेट शरद पवार यांचं नाव घेत शाब्दिक हल्ला चढवला आहे. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा उल्लेख करत या नेत्याने शरद पवारांना थेट सवाल केला आहे. राज्याचे मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी थेट शरद पवारांवर हल्लाबोल केला आहे.
2014 ला भाजपला बाहेरून पाठिंबा देताना यशवंतराव चव्हाण यांचे विचार कुठे गेले होते?, असं अनिल पाटील म्हणालेत.यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न द्या या मागणीवर टीका केली, असंही अनिल पाटील म्हणाले.
अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर शरद पवार गटाकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला दिलं. त्यानंतर पक्ष हिसकावल्याचा आरोप शरद पवार गटाकडून करण्यात आला. त्यावरही अनिल पाटील यांनी भाष्य केलं आहे. पक्ष कोणी एका व्यक्तीमुळे उभा राहत नाही. त्यात सगळ्याचं योगदान असतं, असं अनिल पाटील म्हणालेत.
बारामती लोकसभा मतदारसंघातील लढतीकडे देशाचं लक्ष आहे. नणंद विरूद्ध भावजय अशी ही लढत होत आहे. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार या राजकीय लढाईत कोण जिंकणार? याची राज्यासह देशभरात चर्चा होत आहे. यावर अनिल पाटलांनी प्रतिक्रिया दिली. सुनेत्रा पवार अडीच ते तीन लाख मतांनी विजयी होतील, असा विश्वास अनिल पाटलांनी व्यक्त केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावरही अनिल पाटलांनी भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे हे पूर्ण वेळ मुख्यमंत्री कधी होते ते सांगावं. जर एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते तर संजय राऊतांना कुणी विचारलं नसतं. ज्यांचे 5 खासदार आहेत. त्यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर बोलू नये, असं अनिल पाटील म्हणाले.