राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार आज बारामतीचा दौरा करत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोहित पवार स्थानिकांशी संवाद साधत आहेत. या दौऱ्यादरम्यान रोहित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टोला लगावला आहे. महायुतीच्या जागा वाटपावर बोलताना त्यांनी अजित पवारांना टोला लगावला आहे. केंद्रातून आदेश आले तर महायुतीच्या नेत्यांना ते एकावेच लागतात. दिल्लीवरून भाजपचे जे आदेश येतील. ते अजितदादांना मान्य करावे लागतील आणि एकनाथ शिंदे यांना देखील मान्य करावे लागतील, असं रोहित पवार म्हणालेत.
यंदाची निवडणूक ही इथं असणारी जनता विरुद्ध अजित पवारांनी घेतलेला निर्णय आणि भाजप अशा प्रकारची आहे. सध्या बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या पक्षासाठी आधीसारखंच पॉझिटिव्ह वातावरण आहे. सुप्रिया सुळे शंभर टक्के निवडून येणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांनी पक्ष बांधला आहे. त्यामुळे सुप्रिया ताईंचा विजय हा निश्चित आहे, असं रोहित पवार म्हणाले.
विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. बारामती लोकसभा मतदारसंघात लढण्यावर ते ठाम होते. मात्र आता त्यांनी माघार घेतली आहे. त्यावरही रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. विजय शिवतारे यांनी आधी अजित पवारांवर टीका केली होती. आता ते यू टर्न घेत आहेत. नेत्यांना भेटल्यावर भूमिका बदलणार असाल तर हे लोकांना न आवडणारं आहे. तुम्ही अजित पवारांच्या विरोधात बोललेले व्हीडिओ लोकांपर्यंत गेले आहेत. ते आता डिलीट कसं करणार? असं त्यांनी म्हटलं.
देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सुरु असणाऱ्या बैठकांच्या सत्रावरही रोहित पवारांनी भाष्य केलं. सागर बंगला काही गोष्टी अनेकांना देण्याचं केंद्र झालं आहे. भाजपने पक्ष आणि घर फोडलं भाजपचे देखील अनेक मतदार आता तुतारीला मतदान करतील. बारामती लोकसभा मतदारसंघातील नेते हे केवळ जनतेला खुश करण्यासाठी नाराज ते अजित पवारांचा प्रचार करणार नाहीत. सुप्रिया सुळे यांचे लीड अडीच लाखाच्यावर असेल, असं रोहित पवार म्हणाले.