पुणे : भाजपा कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज पुण्यात मूक निषेध आंदोलन (Agitation) करण्यात येत आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. पुण्यातील झाशीच्या राणी पुतळ्यासमोर हे मूक आंदोलन करण्यात येत आहे. बालगंधर्व चौकात (Balgandharv Chowk) पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Union Minister Smriti Irani) यांच्या दौऱ्यात पुण्यात बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली होती. त्याचा राष्ट्रवादी तसेच काँग्रेस, शिवसेना या पक्षांतर्फे निषेध करण्यात येत आहे. काल राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही यावर आक्रमक पवित्रा घेत कठोर शिक्षेची मागणी केली होती. हात उचलणाऱ्यांचे हात तोडू, असे त्या म्हणाल्या होत्या. माविआच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेटही यावेळी घेतली.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात झाला. त्यावेळी इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा राडा पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होताच जोरदार घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीमुळे भाजपाचा कार्यक्रम काही वेळ थांबवावा लागला होता. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आणि कार्यक्रमातून बाहेर काढले. मात्र, घोषणाबाजी केल्यानंतर आपल्याला भाजपाच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनीही मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे वातावरणात तणाव निर्माण झाला होता.
बालगंधर्व रंगमंदिरातराष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकाऱ्यांना भाजपा कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. या घटनेनंतर दोन्ही पक्षाकडून आरोप-प्रत्यारोपणाच्या फैरी झडत आहेत. आता मारहाणीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगीता तिवारी यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे तक्रार केली. या तक्रारीद्वारे भाजपा पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांना मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ सर्वत्र व्हायरल झाले. त्यानंतर डेक्कन पोलिसांनी या घटनेची दखल घेत भाजपा कार्यकर्त्यांवर गुन्हेही दाखल केले. मात्र पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर मोक्काअंतर्गत भाजपावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली.