योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9, पुणे | 24 ऑक्टोबर 2023 : कर्जत जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या युवा संघर्ष यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. पुण्यातील लाल महालात जात रोहित पवार यांनी जिजाऊंच्या पुतळ्याला अभिवादन केलं आणि युवा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली. यावेळी बोलताना रोहित पवार यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आज ग्रामीण भागात शेतकरी अडचणीत आहे. सर्वसामान्य लोक अडचणीत आहेत. त्यावर कुणीच चर्चा करत नाही. याला अन्याय म्हणतात आणि या अन्यायाला एकच उत्तर आहे ते म्हणजे संघर्ष. तो संघर्ष आपल्याला करावा लागेल, असं रोहित पवार म्हणाले.
आपली ही युवा संघर्ष यात्रा राजकीय हेतूने नाही. तर तरूणाईच्या सामन्य लोकांच्या प्रश्नांसाठची आहे. शरद पवारांनी या यात्रेवर शिक्कामोर्तब केलं आहे. युवा संघटित झाल्यावर मोठं-मोठं सरकार झुकत असतं. कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतल्यावर यात्रा थांबेल असं काहींना वाटलं होतं. मात्र ही यात्रा सुरूच राहणार आहे. सत्ता येते-जाते. पण मात्र विचार कायम राहतो. त्या विचारासाठी आपण लढतो आहोत, असं रोहित पवारांनी म्हटलं.
सत्ताधारी जे या यात्रेवर टीका करत आहेत. त्यांना मी 45 दिवसानंतर उत्तर देणार आहे. आता राजकारण नाही. तर फक्त युवांच्या प्रश्नासाठी लढणार आहे. शरद पवारही तरुणांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहेत. शिवाय आमच्या या यात्रेसोबत असल्याचं शरद पवारांनी सांगितलं आहे. तरुणांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाही. तर पुढे काय करायचं ते आम्ही ठरवू, असं रोहित पवार म्हणालेत.
मला सांगितलं की तू रथ यात्रा काढायला पाहिजे होती. पण अशा रथयात्रा म्हणजे एक गाडी येते. एसीत बसून यात्रा काढली जाते. असं म्हणत रोहित पवार यांनी भाजपच्या रथ यात्रेवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
अधिवेनशात कुणी कविता म्हणतात. कुणी गाणं म्हणतंय. कुणी काहीतरी कमेंट करतंय. शरद पवारांचा एक काळ होता. त्यावेळी गांभीर्याने चर्चा होत होती. कविता ऐकून काय मिळणार आहे? आम्ही भूमीका बदलावी आणि सत्तेत जावं असं सांगितलं जातं होतं, असंही रोहित पवार म्हणाले.