अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 21 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. राज्यातल्या आरोग्य विभागात सगळ्यात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. राज्याला आरोग्य संचालक नाहीत. निधीचे पैसे गरिबाला दिले जात नाहीत. आपल्या आरोग्य मंत्र्यांना हाफकीन माणूस आहे की कंपनी हे सुद्धा माहिती नाही! आरोग्यमंत्र्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. लोकांना औषधं मिळत नाहीत. कर्मचारी भरती केली जात नाहीये, असं म्हणत रोहित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका केली आहे.
लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पक्ष फोडला गेला. आमचं कटुंब आणि राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांनाही फोडलं गेलं. या सगळ्या नेत्यांचा वापर लोकसभेसाठी केला जाईल आणि नंतर त्यांना बाहेर काढतील. सगळे मंत्री हे नावापुरते आहेत. पण सगळा कारभार मात्र देवेंद्र फडणवीस सांभाळतात. पुढच्या निवडणुकीत सगळ्यांना भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढवायला सांगतील, असंही रोहित पवार म्हणालेत.
भाजपकडून करण्यात येणारी आंदोलनं म्हणजे ही सगळी नाटक सुरू आहेत. यांना फक्त नाटक करता येतात. यांचे कार्यकर्ते तमाशा करत आहेत. त्यांना काहीच माहिती नाही. हे सगळे tv वर येऊन खोटं बोलत आहेत, असं म्हणत रोहित पवार यांनी टीका केली आहे.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणावरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गुजरातमध्ये 1 लाख कोटींचं ड्रग्स पकडले गेलं. मग वर्षभरात किती कोटींचा व्यवहार होत असेल, याचा विचार करा. ललित पाटील अॅडमिट आहे. तो ससूनमध्ये बसून ड्रग्स रॅकेट चालवत होता. डीनला याची माहिती देखील नाही? याचा अर्थ हा ठाकूर देखील यात सहभागी आहे. कुणा मंत्र्यांचा डीनला फोन आल्याने ललितला तिथं 9 महिने ठेवण्यात आल, याचा खुलासा झाला पाहिजे. युवा संहर्ष यात्रेत आम्ही ड्रग्सचा मुद्दा देखील घेतला आहे. त्यावरही आम्ही आवाज उठवणार आहोत, असं रोहित पवार म्हणालेत.
राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबत सुरु असणाऱ्या सुनावणीवरही रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाने जर संविधान मनात ठेवून निर्णय घेतला तर पक्षाचं चिन्ह शरद पवारसाहेंबानाच मिळेल, असं रोहित पवार म्हणाले.