अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 29 ऑक्टोबर 2023 : राज्याच्या मुख्यमंत्रिपदी नेमकं कोण असणार, अशी चर्चा असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीव्ही 9 मराठीच्या मुलाखतीत मोठा दावा केला. जरी एकनाथ शिंदे हे अपात्र झाले तरी ते मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. त्यांच्या या मुलाखतीची राजकीय वर्तुळात चर्चा होत असतानाच ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या या वक्तव्यावर घणाघाती टीका केली आहे. एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यावरही त्यांचं मुख्यमंत्रिपद टिकवणार आहेत. त्यासाठी त्यांच्याकडे वेळ आहे. पण मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी वेळ नाही, असं म्हणत संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे.
गरज पडल्यास एकनाथ शिंदे यांना विधानपरिषदेवर घेऊ आणि त्यांचं मुख्यमंत्रिपद टिकवू, हे कोण सांगत आहे तर देवेंद्र फडणवीस… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः घटनाबाह्य ते अपात्र ठरतील ही देवेंद्र फडणवीस यांना खात्री आहे. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रिपद टिकवायला तोडगा आहे. पण मराठा आरक्षणावर यांच्याकडे तोडगा नाही, असा घणाघात राऊतांनी केला आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहतील. पण बाकी 40 जणांचं काय? देवेंद्र फडणवीस यांचं हे विधान धिक्कार करण्यासारखं आहे. हे लोक कायदा आणि संविधान याचा आदर करत नाहीत. हे लोक सर्वोच्च न्यायालयाचे मानायला देखील तयार नाहीत. ही तर मस्ती आणि माज 2024 साली जनता माज उतरवेल. गृहमंत्र्यांनी कायद्याची भाषा केली पाहिजे. पण तुम्ही घटनाबाह्य सरकाराला वाचवण्याची भाषा करत आहात. देवेंद्र फडणवीस हे तुम्हाला शोभत नाही, असंही संजय राऊत म्हणाले.
टीव्ही 9 मराठीवर देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत झाली. या मुलाखतीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच मुख्यमंत्रिपद राहिल ते अपात्र ठरल्यास त्यांना विधानपरिषदेवर घेऊ. पण मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडेच राहील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्लॅन बीची काहीही आवश्यकता नाही. बी प्लानचा गरज नाही. फक्त ए प्लान आहे. शिंदेच मुख्यमंत्री राहतील. ते अपात्र ठरणार नाहीत. त्याची आम्हाला खात्री आहे. आम्ही कायद्याचा अभ्यास केला आहे. त्यामुळे शिंदेच मुख्यमंत्री राहतील, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.