राज्यात गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे अनेक धरणांमधून नदीपात्रात सोडण्यात आलं. पुण्यामध्ये तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले तर वारजे भागातील एका गोठ्यातील जनावरेही दगावली होतीत. खडकवासला धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने नदापात्रातून पाणी बाहेर निघाले. मानवी वस्तीमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अशातच आज म्हणजेच रविवारी खडकवासला धरणामधून रात्री आठ वाजता पाणी सोडण्यात आलं आहे.
खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात 7 हजार 704 क्यूसेक विसर्ग करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी किंवा जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही साहित्य किंवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत, असं आवाहन मुठा कालवा पाटबंधारे उपविभागाकडून करण्यात आलं आहे.
नदी पात्रातील निषिद्ध क्षेत्रात उतरू नये, पाटबंधारे विभगाच्या नागरिकांना सूचना करण्यात आल्या आहेत. सखल भागातील नागरिकांनी नदी पात्रात जाऊ नये, पाटबंधारे विभागाकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. पुढील 48 तासात मुठा नदी मध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील धरणं 100 टक्के भरण्याच्या मार्गावर आहेत.
पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पाऊस झाला होता. यामध्ये पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसामुळे नागरिकांचे नुकसान झाल्याचे पाहायला मिळालं होतं.