नितेश कराळे गुरुजी आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले. मागील आठवड्यात कराळे गुरुजी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. वर्धा लोकसभा जागेसाठी कराळे गुरुजी इच्छुक आहेत. शरद पवार यांनी जर आदेश दिला तर ही निवडणूक लढवणार अशी प्रतिक्रिया कराळे गुरुजी यांनी मागच्या आठवड्यात दिली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा पुण्यात ही भेट झाली. या भेटीनंतर नितेश कराळे गुरुजी यांनी टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. यावेळी निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचा निर्धार नितेश कराळे गुरुजी यांनी व्यक्त केला.
शरद पवारांसोबत आज सातवी भेट झाली. शरद पवारांनी काम सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या. लोकसभा निवडणूक आणि उमेदवारीबाबत 26 किंवा 27 तारखेला अंतिम निर्णय होईल. अमर काळे तयारी लागले आहेत त्यांच्या उमेदवारी बाबत अंतिम निर्णय नाही. आधी राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार आहे आणि नंतर उमेदवारी मागणार आहे, असं नितेश कराळे यावेळी म्हणाले.
मी एकनिष्ठ राहणार असा शब्द दिला आहे. महाविकास आघाडीचं काम करतोय कोणत्याही आमदार खासदार यांच्याविरोधात बोलत नाही. वर्धा लोकसभेत 3 ते 3.5 लाख मत आहेत ती आपल्याला मिळू शकतात. विद्यमान खासदारांनी 10 वर्षात विकासकामं केली नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाहीत, असा आरोप नितेश कराळे म्हणाले.
तुतारी घेऊन संसदेत पक्षाचा आवाज बुलंद करेन असं शरद पवारांना सांगितलं. जे महाराष्ट्रातील नेते करत करत नाहीत ते मी करतोय. लोकांच्या हितासाठी मी लढतो आहे. विद्यार्थ्यांचे प्रश्न मला माहिती आहेत. या प्रश्नांना लोकसभेत मांडणं अन् ते प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. त्यासाठी मी उमेदवारी मागतो आहे. शरद पवारांनी ही उमेदवारी दिली तर मी निश्चित लढणार आणि निवडूनही येणार आहे, असं कराळे गुरुजी म्हणाले.