पुणे : पुणे (Pune) जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील पानशेत धरण (Panshet Dam) आज सकाळी १०० टक्के भरले आहे. त्यामुळे पानशेत धरणाच्या सांडव्यावरून नदीपात्रामध्ये सुरू असणारा 3908 क्यूसेक्स विसर्ग वाढवून ठीक ७३७६ क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्याबरोबर पावसाच्या प्रमाणावर धरणातून सोडण्यात येणार विसर्ग कमी जास्त करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला (Khadakwasla) , पानशेत व वरसगाव प्रकल्प, सहाय्यक अभियंता, श्रेणी 1, यो.स.भंडलकर यांनी दिली. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की, कृपया नदीपात्रात उतरू नये. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी अशी माहिती जाहीर करण्यात आली आहे. मागच्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक धरण भरली आहे. त्यामुळे अनेक नद्या दुथडी भरुन वाहत आहेत.
धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी १२ दरम्यान खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये साधारण 1712 क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. तसेच पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग पुन्हा कमी/जास्त करण्याची शक्यता असल्याची माहिती जाहीर करण्यात आली आहे.
मावळ तालुक्यातील भात लागवड आता अंतिम टप्प्यात आली आहे. जुलै महिन्यात सुरुवातीला पाऊस पडला परंतु नंतर पावसाने ओढ दिल्याने लागवडी रखडल्या होत्या. आता तीन दिवसापासून पावसाला जोरदार सुरुवात केल्याने भात लागवडीला वेग आलाय. खरीप हंगामच्या दृष्टीने मावळ तालुक्यातील शिळिंब या गावात चारसूत्री भात लागवड कृषी अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. चारसूत्री लागवडीमुळे भाताच्या उत्पादनात वाढ होत असल्याने शेतकरी या लागवडीला पसंती देत आहेत. या भागात अतिमुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार आहे. राज्यात मागच्या चार दिवसांपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.