पुणे : पुण्येश्वर मंदिरावरून (Punyeshwar temple) मनसे आणि हिंदू महासंघाने घेतलेली भूमिका हा राजकीय स्टंट असल्याचा आरोप पतित पावन संघटनेने (Patit Pavan Sanghatana) केला आहे. पुण्यातील पुण्येश्वर तसेच नारायणेश्वर मंदिराच्या जागी मशिद उभारल्याचा दावा करत सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) आणि हिंदू महासंघ आक्रमक झाला आहे. यावर पतित पावन संघटनेने टीका करत म्हटले आहे, की या संदर्भातील याचिका ही न्यायप्रविष्ट आहे. आम्हाला न्यायालयात न्याय भेटेल. या संदर्भातील याचिका आधीच दाखल आहे त्यामुळे विषय बाजूला जाऊ नये. तसेच पुण्य ग्रामचा पुण्येश्वर ही पुस्तिकादेखील आम्ही काढली होती, असे पतित पावन संघटनेने म्हटले आहे. संघटनेचे स्वप्नील नाईक यांनी हा विषय राजकीय होत असून यावर टीका केली आहे.
हा राजकीय विषय नसून हिंदू धर्माच्या आस्थेचा, श्रद्धेचा विषय आहे. त्यामुळे काही लोकांनी स्टंटबाजी करू नये. हे मंदिर यादवांच्या काळातील आहे. भारतीय इतिहास संशोधन मंडळाने यावर अभ्यास केला आहे. आम्ही यावर पुस्तिकाही काढली आहे. तर पुण्यातील हिंदुत्त्ववादी संघटना यावर काम करत आहेत. त्यामुळे कोणीतरी येईल आणि म्हणेल आम्ही याचिका दाखल करतो. मुळात या प्रकरणी आधीच याचिका दाखल आहे. त्यामुळे न्यायालय जो निर्णय देईल, तो सर्वांनाच मान्य असेल. न्यायव्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास आहे, असे स्वप्नील नाईक म्हणाले.
पुण्येश्वर मंदिराच्या इथे महादेव मंदिर नाही. तिथे छोटा दर्गा होता, तो आता मोठा झाला आहे. पुण्येश्वर महादेवाचे मंदिर मोकळे करण्याची वेळ आली आहे, असे हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केले. तसेच यासंबंधी मनसेने घेतलेली भूमिका योग्यच असल्याचेही त्यांनी म्हटले होते. ज्या पुणे शहराला महादेवाच्या नावाने पुणे हे नाव पडले, ते पुण्येश्वर मंदिर तेथे उपलब्ध नाही. आता हिंदू महासंघ आणि मनसे एकत्र आले तर आम्ही लवकरच मंदिर मोकळे करू. पुरावे देण्याचा वेळ गेली. ज्ञानवापीसारखे काय करायचे ते करा, नाहीतर कारसेवा अटळ आहे, असा इशाराच त्यांनी याप्रकरणी दिला होता.