Pizza Broken Knife Found : पिझ्झा म्हटलं की आपल्या तोंडाला सहज पाणी सुटलं. पिझ्झा हा फक्त जगभरात नव्हे तर भारतातील भरपूर शहरांमध्ये आणि घरांमध्ये सहज उपलब्ध आहे. पिझ्झा हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ बनला आहे. पण आता जर तुम्ही पिझ्झा खात असाल तर लगेच सावध व्हा. कारण पिंपरी चिंचवडमध्ये एका पिझ्झामध्ये चाकूचां तुटलेला तुकडा आढळल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. यामुळे असंख्य नागरिकांना मोठा धक्का बसला आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी परिसरातील इंद्रायणीनगर मध्ये डॉमिनोज पिझ्झामध्ये चाकूचा तुटलेला तुकडा आढळून आला आहे. काल रात्री हा सर्व प्रकार घडला आहे. इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या अरुण कापसे या व्यक्तीने याबद्दल तक्रार केली आहे. अरुण कापसे या व्यक्तीने आपल्या कुटुंबियांसाठी काल रात्री जय गणेश साम्राज्य चौकातील डॉमिनोज पिझ्झा स्टोअर पिझ्झा ऑर्डर केला होते. त्याने एकच पिझ्झा ऑर्डर केला होता आणि त्या पिझ्झाची किंमत 596 रुपये होती.
अरुण आपल्या कुटुंबासोबत तो पिझ्झा खाण्यासाठी कुटुंबासोबत बसले. आपल्या कुटुंबियांसोबत पिझ्झाचा आस्वाद घेत असताना अचानक अरुण कापसे यांच्या दातात पिझ्झा कट करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकूचा तुटलेला तुकडा आढळला. हा तुकडा त्यांच्या दातात अडकला. यानतंर अरुण कापसे यांनी डॉमिनोज पिझ्झाच्या मॅनेजरला घडलेला सर्व प्रकार सांगितला. सुरुवातीला त्यांना डॉमिनॉज पिझ्झाच्या मॅनेजरकडून उडवाउडवीची उत्तर मिळाली. पण मॅनेजरने घरी येऊन पिझ्झामधील तुटलेला चाकूचा तुकडा प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसला.
या सर्व प्रकारानंतर डॉमिनोज पिझ्झाकडून अरुण कापसे यांना त्यांच्या पिझ्झाच्या ऑर्डरचे पैसे लगेचच परत करण्यात आले. मात्र नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या डॉमिनोज पिझ्झा विरोधात अरुण कापसे यांनी पुणे जिल्हा अन्न व औषध विभाग प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. यासोबतच अरुण कापसे यांनी नागरिकांनी कोणतीही वस्तू खाताना जपून खावी, असा सल्ला दिला आहे.