पुणे: कोरोना संकटामुळे अगोदरच रडतखडत सुरु असलेल्या पुण्यातील PMPML बस सेवेला आता इंधन दरवाढीचा मोठा फटका बसताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत वेगाने वाढ झाली आहे. डिझेलची किंमत वाढल्याने PMPML ची संचलन तूट तब्बल 600 ते 700 कोटी इतका होण्याचा अंदाज असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली. गेल्यावर्षी ही तूट 497 कोटी होती. मात्र, यंदा पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही इंधनांच्या दरात वाढ झाल्याने वित्तीय तुटीचा आकडा वाढला आहे.
आर्थिक संकटामुळे यंदा पुणे महापालिकेची महापौर चषक स्पर्धा रद्द होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी महापौर चषक स्पर्धा रद्द करण्यात आली होती. महापौर चषक स्पर्धेच्या आयोजनासाठी महापालिकेच्या वित्तीय समितीने नकार दिला. स्पर्धेसाठी महापालिकेकडून सात ते आठ कोटी रुपये खर्च केले जातात. वित्तीय समितीने आर्थिक संकटाचे कारण पुढे करत स्पर्धा घेण्यास व त्यासाठी होणाऱ्या खर्चास मान्यता देण्यास नकार दिला.
ऑक्टोबर महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 90 डॉलर्स प्रतिबॅरल इतके होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.77रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 102.52 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.73 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.84आणि 94.57रुपये इतका आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
इतर बातम्या:
कच्च्या तेलाचे दर तीन वर्षांतील उच्चांकी पातळीवर, भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अटळ?
Fuel Credit cards: पेट्रोल-डिझेल स्वस्तात हवंय, फ्युएल कार्ड वापरा, वर्षाला 71 लीटर इंधन मोफत मिळवा
खनिज तेलाचा दर घसरल्यानंतही भारतात पेट्रोल-डिझेल अजूनही महाग का?