माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक, रात्र तुरुंगातच काढावी लागणार

| Updated on: Dec 15, 2020 | 9:48 PM

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक, रात्र तुरुंगातच काढावी लागणार
Follow us on

पुणे : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना पुण्यात अटक झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हर्षवर्धन जाधव यांनी किरकोळ अपघाताच्या वादातून एका दुचाकी स्वाराला मारहाण केली होती. या प्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. मात्र, जाधव यांच्याकडून अटक टाळण्यासाठी छातीत दुखत असल्याचं कारण सांगण्यात येत होतं. मात्र, अखेर पुणे पोलिसांनी हर्षवर्धन जाधव यांची ससूनमध्ये तपासणी करुन त्यांना रिसतर अटक केलं (Pune Police arrest Ex MLA Harshavardhan Jadhav ).

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना आजची (15 डिसेंबर) रात्र तुरुंगातच काढावी लागणार आहे. कारण पुणे पोलीस त्यांना उद्याच शिवाजीनगर कोर्टात हजर करणार आहेत. न्यायालयासमोर हजर केल्यानंतरच त्यांना जामीन मिळतो की नाही हे स्पष्ट होणार आहे. हर्षवर्धन जाधव यांच्याविरोधात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. हर्षवर्धन जाधव यांच्यासह इषा झा यांच्याविरोधातही खूनाचा गुन्हा दाखल आहे.

अमन अजय चड्डा यांच्या तक्रारीवरुन या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. पुण्यातील चतुश्नृंगी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अमन चड्डा यांनी आपल्या तक्रारीत त्यांचे आई वडील जखमी झाल्याचं म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

तक्रारीत म्हटलं आहे, “पुण्यातील औंध भागातून माझे आईवडील दुचाकीवरुन जात असताना हर्षवर्धन जाधव यांनी अचानक आपल्या गाडीचा दरवाजा उघडल्याने त्यांचा अपघात झाला. या अपघातात आई गंभीर जखमी झाली. वडिलांचेही नुकतेच एन्जीओप्लास्टी आणि ओपन हार्ट ऑपरेशन झालेले आहे. हे सांगूनही हर्षवर्धन जाधव यांनी त्यांच्या छातीवर बुक्क्या व लाथांनी मारहाण केली. तसेच त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.”

“हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत असलेली महिला इषा झा यांनीही जाधव यांच्यासोबत संगनमत करुन शिवीगाळ करत हाताने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वडिलांच्या पोटामध्ये आणि छातीवर लाथाबुक्क्या मारल्या. आईलाही ढकलून दिलं. आईच्या पायावर लाथ मारुन तिला ढकलून दिले. यामुळे तिच्या पायालाही गंभीर दुखापत केली,” असंही या तक्रारीत म्हटलं आहे.

हेही वाचा :

हर्षवर्धन जाधवांचा अटकपूर्व जामीन फेटाळला, कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

रावसाहेब दानवे माझं घर फोडत आहेत, जावयाचा सासऱ्यावर गंभीर आरोप