पुणे : कुख्यात राजेश राम पापुल उर्फ ‘चोर राजा’ याला पुणे पोलिसांनी (Pune police) अटक केली आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील 100हून अधिक गुन्ह्यांमध्ये पोलीस त्याच्या शोधात होते. पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट 2ने त्याच्या घरातून त्याला अटक केली. 37 वर्षीय राजेश कात्रज (Katraj) येथील रहिवासी असून त्याला 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) यांच्या नेतृत्वाखालील आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीनिवास घाडगे यांचा समावेश असलेले पथक, गजानन टोम्पे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील मागील चार ते पाच महिने त्याच्या शोधात होते. पोकळे यांच्या म्हणण्यानुसार, मोठ्या गृहनिर्माण सोसायट्यांमधील घरे (Housing Societies) फोडण्याची आणि लुटण्याचा धडाका चोर राजाने लावला होता. म्हणूनच त्याला ‘राजा’ म्हणून ओळखले जाऊ लागले.
राजा मोबाइल फोन किंवा गॅझेट वापरत नसल्याने त्याचा माग काढणे अवघड होते. राजाने वयाच्या सातव्या वर्षापासूनच दरोडेखोरी करायला सुरुवात केली होती. पोलीस गुन्हेगाराचा कसा माग काढतात, हे त्याला माहीत होते. त्यामुळे त्याने कधीही मोबाइल फोन वापरला नाही. परिणामी त्याला अटक करण्यास वेळ लागला, असे पोकळे म्हणाले.
गुन्हे शाखा युनिट दोनमधील एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, की त्यांनी त्याच्या एका नातेवाईकाच्या पादत्राणांमध्ये जीपीएस मशीन बसवल्यानंतरच त्याला पकडण्यात यश आले. कोविड लॉकडाऊन दरम्यान, बहुतेक लोक घरातून काम करत असल्याने राजाला घरफोडीच्या चोरी करणे अवघड झाले होते. अनेकांची बचतही या काळात संपली होती. त्यानंतर सरकारने निर्बंध उठवताच त्याने घरफोड्या पुन्हा सुरू केल्या.
गुन्हे शाखेच्या युनिट 2च्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की त्यांनी राजाला ट्रॅक करण्यासाठी ‘चोर राजा’ नावाचा एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. तिथे राजाशी संबंधित सर्व अपडेट्स पोस्ट केले जात होते. राजा आपल्याच घरी येत असल्याची खबर पोलीस हवालदार गजानन सोनुने यांना मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून अखेर त्याला अटक केली. विविध पोलीस ठाण्यात त्याच्यावर 14 घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद आहे.