पुणे : पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आलीय. डान्सर गौतमी पाटीलच्या (Gautami Patil) कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. त्यामुळे गौतमी पाटीलसाठी हा मोठा धक्का आहे. गौतमी पाटील ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. तिच्या डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असतात. तसेच तरुणांमध्ये तिची क्रेझ निर्माण झालीय. ‘सबसे कातील, गौतमी पाटील’, असं ब्रीदवाक्य तिच्या नावाने सोशल मीडियावर व्हायरल होतंय.
गौतमी पाटील हिची जितकी क्रेझ तरुणांमध्ये आहे तितकीच ती वादग्रस्त देखील ठरत आहे. तिच्या डान्सच्या स्टेप्समुळे ती मध्यंतरी अडचणीत आली होती. याशिवाय अधूनमधून तिच्या डान्सच्या वेगवेगळ्या व्हिडीओमुळे ती नेटीझन्सच्या टीकेची धनी ठरते.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला पुण्यात नाकारण्यात आल्याची माहिती समोर आल्यानंतर विविध चर्चांना उधाण आलंय. पण पोलिसांनी कायदेशीर कारणास्तव तिच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
पुण्यातील शिवणे येथे आज गौतमी पाटीलचा कार्यक्रम होणार होता. पण कार्यक्रमाच्या आयोजकांनी NOC आणि आवश्यक कागदपत्रे न दिल्याने पोलिसांनी परवानगी नाकारल्याची माहिती मिळत आहे.
शिवणे येथील स्थानिक नेत्याच्या कार्य अहवालाचे प्रकाशन या कार्यक्रमात होणार होते. याच कार्यक्रमाला गौतमी पाटील प्रमुख पाहुणी म्हणून येणार होती. पण आयोजकांकडून कार्यक्रमाची योग्य ती खबरदारी घेतली न गेल्याने पोलिसांनी परवानगी नाकारली.
गौतमी पाटील हिचा कार्यक्रम वारंवार चर्चेत येतो. कधी गौतमी पाटील हिने अश्लिल डान्स केल्याचा आरोप केला जातो. तर कधी तिच्या कार्यक्रमात इतकी गर्दी जमते की मैदानाच्या बाजूला असलेल्या शाळेच्या छतावर उभ्या असलेल्या लोकांच्या वजनाने कौलारु छत कोसळतं. गौतमीच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी एका जणाचा मृत्यू झाल्याची देखील बातमी समोर आली होती.
काही दिवसांपूर्वी गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी जास्त धिंगाणा घातल्यामुळे कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिलांनी हातात काठी घेतल्याचं समोर आलं होतं. या घटनेनंतर गौतमीच्या कालच्या सांगलीच्या कार्यक्रमात महिलांनी पाठ फिरवल्याची देखील माहिती समोर आली होती.
गौतमी पाटील ही मुळची खान्देशातील शिंदखेडा या तालुक्यातील आहे. तिच्या घरची परिस्थिती खूप बेताची होती. ती लहान असतानाच आपल्या आईसह पुण्यात राहायला आली होती.
गौतमीच्या आईने खूप कष्ट करत गौतमीच्या शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण या दरम्यान गौतमीच्या आईची प्रकृतीदेखील बिघडली. अखेर गौतमी हिने घराची जबाबदारी सांभाळली.
गौतमी डान्स क्लासला जायची. तिथून ती डान्स शिकली. त्यानंतर ती ऑर्केस्ट्रामध्ये सहभागी होऊ लागली. असा प्रवास करत ती आज राज्यातील प्रसिद्ध डान्सरपैकी एक यशस्वी डान्सर बनली आहे.