वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत नवनवे खुलासे रोज समोर येत आहेत. पूजा खेडकर यांनी पुण्यातील काशीबाई नवले मेडिकल कॉलेजमध्ये 2007 मध्ये MBBS डिग्रीसाठी अॅडमिशन घेतलं. यावेळी पूजा खेडकर यांनी ओबीसी- भटक्या जमाती-3 कोट्यातून अॅडमिशन मिळवलं. पण यावेळी अॅडमिशन घेत असताना त्यांनी कोणतंही अपंगत्व प्रमाणपत्र कॉलेजमध्ये जमा केलं नव्हतं. पूजा खेडकर यांना 200 पैकी 146 गुण मिळाले होते. त्यानंतर त्यांनी विनाअनुदानित खासगी कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं. पूजा यांना दहावीला 83 % टक्के मार्क मिळाले होते. तर बारावीला 74 % गुण पूजा यांनी मिळवले होते.
यूपीएससी परिक्षेत पूजा खेडकर यांना 841 रँक मिळवला होता. त्यानंतर त्यांची आयएएसपदी नियुक्ती झाली. पुण्यात त्यांचं प्रोबेशन (प्रशिक्षण) सुरु होतं. प्रोबेशनरी अधिकाऱ्यांना सरकारी सोयी- सुविधा मिळत नाहीत. मात्र पूजा खेडकर यांनी त्यांच्या वैयक्तिक ऑडी कारला लाल-निळा दिवा लावला होता. ‘महाराष्ट्र सरकार’ असा बोर्डही त्यांनी गाडीवर लावला होता. या शिवाय सरकारी कार्यालयात स्वतंत्र केबीन, सरकारी गाडी, घर देण्यात यावं. तसंच सरकारी कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी असावेत, अशी त्यांनी मागणी केली.
याशिवाय अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या केबीनवर त्यांच्या अनुपस्थितीत ताबा मिळवला. यानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पूजा खेडकर यांच्या विरोधात राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र लिहित तक्रार केली. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केल्याचाही आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर पूजा यांची वाशिम जिल्ह्यात बदली करण्यात आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या त्या परिक्षार्थीची चौकशी व्हावी. अनेकांनी दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र दिलेत, तोपर्यंत निकाल लावू नये, अशी मागणी आहे. परीक्षा देताना अनेक जण दिव्यांग असल्याची कागदपत्रे देतात, ती बोगस असल्याचं समोर आलेलं आहे. काहींनी तर आधी एक आणि दुसऱ्या वेळेस दुसरं अशी दोन सर्टिफिकेट दिलेलं आहे. परिक्षार्थीच्या सोयीनुसार हे अपंगत्व येतंय. यातून ते शासकीय नोकरी मिळवतात, त्यांना भत्ता मिळतो. बढती मिळते. स्पर्धा परिक्षेचे जे विद्यार्थी असे पास झालेत. त्यांची चौकशी व्हावी. तोपर्यंत त्या परीक्षेचा निकाल जाहीर करू नये, अशी मागणी विजय कुंभार यांनी केलीय.