तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे देतो, पण…; अपघातानंतर वेदांत अग्रवालने कुणाला ऑफर दिली?

| Updated on: May 28, 2024 | 8:04 PM

Porsche Accident Case Eyewitness Amin Shaikh on Vedant Agrawal : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात आता एक मोठा खुलासा समोर आला आहे. हा अपघात झाला तेव्हा नेमकं काय घडलं? यावर प्रत्यक्षदर्शीने प्रतिक्रिया दिली आहे. वेदांतने पैशांची ऑफर दिल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाचा...

तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे देतो, पण...; अपघातानंतर वेदांत अग्रवालने कुणाला ऑफर दिली?
Follow us on

पुण्यातील कल्याणीनगर परिसरात पोर्शे कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात रोज नवे अपडेट्स समोर येत आहेत. अपघातानंतर वेदांत अग्रवाल आणि त्याच्या मित्रांनी उपस्थितांना पैसे ऑफर केल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात झाला, त्यावेळी तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शी अमिन शेख यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. जेव्हा अपघात झाला तेव्हा लोक त्या कारमधल्या मुलांना मारू लागले. तेव्हा त्या मुलांनी मारणाऱ्या लोकांना पैशांची ऑफर दिली. तुम्हाला जेवढे पैसे पाहिजेत तेवढे देतो, पण आम्हाला मारू नका, असं प्रत्यक्षदर्शी आमिन शेख यांनी सांगितलं.

गाडीत किती जण होते?

अपघात झाला तेव्हा गाडीत एकूण तीन मुलं होती. अपघात झाल्यानंतर त्यातला जण पळून गेला अन् दोन जण थांबले. हा भीषण अपघात बघून लोक जमा झाले. त्या लोकांनी गाडीतील मुलांना बाहेर काढलं अन् त्यांना मारलं. पुढे 8-10 मिनिटात पोलिसांची गाडी आली. त्यानंतर पोलीस त्या दोघांना घेऊन गेले, असं प्रत्यक्षदर्शी आमिन शेख यांनी म्हटलं.

पैशांची ऑफर

अपघात झाला तेव्हा पोर्शे कार भरधाव वेगात येत होती. भरधाव वेगात आलेल्या पोर्शेने दुचाकीला जोरदार धडक दिली. अपघात झाल्यानंतर तिथे पोहोचायला मला दोन मिनिटे लागली. तोवर तिथं असणाऱ्या लोकांनी गाडीतल्या लोकांना बाहेर काढलं अन् त्याला मारायला सुरुवात केली होती. मी पोहोचलो तेव्हा लोक म्हणाले की यातला एक जण पळाला आहे. लोक मारत होते तेव्हा तुमचं जे काही नुकसान झालं असेल त्याची भरपाई म्हणून जे काही पैसे हवे असतील ते आम्ही देतो पण आम्हाला मारू नका, असं हे लोक म्हणत होते, असं आमिन शेख यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.

नेमकं काय घडलं होतं?

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील कल्याणीनगरमध्ये पोर्शे कारने दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. या पोर्शे कार अपघात प्रकरणात आता रोज नवे नवे खुलासे होत आहेत. या अपघातावेळी तिथं उपस्थित असणाऱ्या प्रत्यक्षदर्शीने यावर सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. आमिन शेख यांनी घटनेची सविस्तर माहिती दिली आहे. आमिन शेख हे रिक्षा चालक आहेत, जे अपघातावेळी घटनास्थळी उपस्थित होते.