अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 08 जानेवारी 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी एकजूट केली आहे. विरोधकांनी केलेल्या ‘इंडिया’ आघाडीत बरेच पक्ष सामील होत आहेत. वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील होण्याबाबत चर्चा सुरु आहे. अशातच वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीतील जागावाटपावर भाष्य केलं आहे. आजपर्यंत जागावाटप का केलं नाही, यांचं प्रामाणिक उत्तर त्यांनी जनतेला सांगावं. त्यांनी सगळ्या गोष्टी क्लिअर कराव्यात, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
उद्या महाविकास आघाडीची दिल्लीत बैठक होणार आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं आहे. मला उद्याच्या बैठकीच आमंत्रण नाही. मला वर्तमानपत्रातून कळला आहे की उद्या बैठक आहे. मात्र आमंत्रण पाठवला आहे. अजून माझ्यापर्यंत आलं नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी बोलताना अकोल्याची लोकसभेची जागा वंचिने लढावी, असं म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर आंबेडकरांनी भाष्य केलं आहे. सगळ्यांना माझी ऑफर आहे… आमच्यासाठी फक्त अकोला महत्वाचं नाही. अकोलाच काय उद्या पुण्यातही मी लढू शकतो, असं प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं आहे.
मी लढले किंवा नाही फरक पडणार नाही. ज्यांना लढायचंय, त्यांनी लढावं. मी मदत करेन. पण जागावाटपाचा काय ते सांगावं.जागा वाटपबद्दल काय चर्चा झाली ते शिवसेना ठाकरे गटाने सांगावं. राष्ट्रवादी किती लढवणार, कॉंग्रेस किती लढणार हे सांगावं. जो कुणी लढले त्याला जिंकून आणू, हा माझा विश्वास आहे. आजपर्यंत जागा वाटप का केले नाही याचं प्रामाणिक उत्तर त्यांनी जनतेला सांगावं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
कोरेगाव भीमा सुनावणी प्रकरणावरही आंबेडकरांनी भाष्य केलं. आजच्या सुनावणीत मुंबईत झालेल्या हल्ल्याची सुद्धा इन्फॉर्मेशन आधीच होती. परंतु संबंधित पोलीस स्टेशनला ती माहिती दिली गेली नाही. त्यामुळे हा हल्ला वाचवता आला नाही. कोरेगाव भीमा प्रकरणात देखील पोलीस खात्याकडून एक तारखेला काहीतरी कोरेगाव भीमा येथे होईल, असं सांगण्यात आलं आणि तरीही हे सगळं घडलं. त्या दिवशी नेमकं काय घडलं याची माहिती कमिशन पुढे अजूनही आली नाही. ही माहिती कलेक्ट करावी अशी साक्ष माझी झाली आहे. त्यावेळेसचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक त्यांना पुन्हा साक्षीला बोलावण्यात यावं असं झालं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष होणंही देखील महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्र्यांपर्यंत ही बातमी गेली होती का? किती वाजता गेली होती. हे देखील कळणं गरजेचं आहे. म्हणून तत्कालिन मुख्यमंत्र्यांना सुद्धा साक्षीला बोलावण्यात यावं अशी मागणी मी त्या ठिकाणी केली आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणालेत.