योगेश, बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 14 फेब्रुवारी 2024 : शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याची बातमी समोर आली. पण या बातमी मागचं सत्य काय? याबाबत शरद पवार गटाच्या बड्या नेत्यानं स्पष्टपणे भूमिका मांडली. चुकीची बातमी पेरली गेल्याचं शरद पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलं आहे. याबातमीत काहीही तथ्य नाही. आमचा पक्ष शरद पवार आहे. आमचं चिन्ह शरद पवार आहे. त्यांच्याच नावावर आम्ही लोकांसमोर जाणार आहोत. त्यामुळे आमचा राष्ट्रवादी पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याच्या बातम्या म्हणजे केवळ अफवा आहेत, असं प्रशांत जगताप यांनी सांगितलं.
शरद पवार गट काँग्रेस पक्षात विलीन होणार, अशी बातमी काहीवेळा आधी आली. त्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. मंगलदास बांदल यांनी माध्यमांशी बोलताना शरद पवार गट काँग्रेसमध्ये सामील होण्याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असं म्हटलं. मात्र ही अफवा असल्याचं शरद पवार गटाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनीही या बातमीवर प्रतिक्रिया दिली. अशा प्रकारच्या कोणत्याही मुद्द्यावर आमच्या बैठकीत चर्चा नाही. आम्ही आगामी निवडणुकीवर चर्चा केली. आमचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही. या सगळ्या अफवा कोण पसरवतं आहे. हे बघितलं पाहिजे, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांनी पक्ष विलीन करण्याच्या बातम्या फेटाळल्या आहेत. आम्ही काँग्रेसमध्ये विलिन होणार ही बातमी पेरण्यात आली. या बातमी कोणतंही तथ्य नाही. आम्ही काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा प्रश्नच येत नाही. आम्ही तीन पक्ष मिळून एकत्र काम करू. आम्हाला लवकरात लवकर चिन्ह मिळाव यासाठी आम्ही आग्रही आहोत, असं अनिल देखमुख म्हणाले.
आम्हाला लवकरात लवकर चिन्ह मिळावं यासाठी आम्ही आग्रही आहोत. ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येईल.आम्ही ताकदीने निवडणूक लढवणार आहोत. अशोक चव्हाण ईडी,सीबीआयच्या भीतीने पळून गेले असतील. त्यांना खासगीत विचारा… आज महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळे लोकांच्या प्रश्नांसाठी आम्ही ताकदीने लढणार आहोत, असं अनिल देशमुख यांनी म्हटलं.