पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यात (Pune District) जोरदार पाऊस (rain) सुरू आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने, खडकवासला धरण (Khadakwasla Dam) शंभर टक्के भरलं आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता दूर झाली आहे. जून महिन्यात पुण्यात म्हणावा तेवढा पाऊस झाला नव्हता. त्यामुळे धरणाच्या पाणीपातळीत घट झाली होती. पाणीपातळी घटल्याने पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढावले होते. मात्र जुलै आणि आता ऑगस्टमध्ये जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्याने धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील इतर धरणे टेमघर धरण, वरसगाव धरण आणि पानशेत धरण ही सुद्धा 96 टक्क्यांच्या वर भरली आहेत. बुधवारी खडकवासला धरणातून 22809 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू होता, या पार्श्वभूमीवर नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता.
मात्र मध्यरात्रीनंतर पुणे शहरासह खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने खडकवासला आणि पानशेत या दोन्ही धरणातून नदीपात्रात करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. पाण्याचा विसर्ग कमी झाल्याने मुठा नदी पात्राच्या पाणीपातळीत देखील घट झाली आहे.भिडे पुलावरचं पाणी ओसरलं असून, पुलावरून तुरळक वाहतूकीला सुरुवात झाली आहे.परंतु नदीपात्राच्या दोन्ही बाजूला पाणी असल्याने अद्याप या भागातील वाहतूक बंद आहे.
दरम्यान गेल्या तीन ते चार दिवसांत पुणे जिल्ह्याप्रमाणेच राज्यातील इतर अनेक भागात देखील जोरदार पाऊस झाला आहे. विदर्भ आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार सुरू असल्याचे पहायाला मिळाले. गोंदिया जिल्ह्याला रेड अलर्ट जारी करण्यात आला होता. तर दुसरीकडे मुंबई आणि पालघरमध्ये देखील जोरदार पाऊस झाला आहे. राज्यात सुरू असलेल्या पावसामुळे जवळपास सर्वच धरणाच्या पाणीपातळी मोठी वाढ झाली आहे.