पुणे | 11 सप्टेंबर 2023 : मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. मागण्या पूर्ण होत नाहीत, तोवर आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे.आमदार रवींद्र धंगेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केलं आहे. मनोज जरंगे पाटलांना आमची विनंती स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या. आंदोलन मागे घ्या. तुमच्या मागे तुमचं कुटुंब आहे. आता निवडणुका काही दिवसांवर आहेत. आपण निवडणुकीत या सरकारला उत्तर देऊ, असं रवींद्र धंगेकर म्हणाले. तसंच मराठा आरक्षणाचा प्रश्न आणि सरकारची भूमिका, यावरही रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा आरक्षणावरून राज्य सरकार लोकांना केवळ भूलथापा देत आहे. राज्य सरकारने भंपक आश्वासन देऊ नये. मराठा समाजाला कित्येक वर्ष झाल फक्त आश्वासन दिलं जातं आहे. निवडणुकीच्या वेळी मोदी आणि फडणवीस यांनी मराठा समाज आणि धनगर समाजाला आरक्षण देवू खोटं सांगितलं होतं. या सरकारला सगळं जड झालं आहे. निवडून आलं की आधी बोललेलंच हे लोक विसरतात, असंही रवींद्र धंगेकर म्हणालेत.
पुण्यात नोंदणी महानिरीक्षक कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसच आंदोलन करण्यात आलं आहे. नोंदणी व मुद्रांक विभागातील संथ गतीने चालत असलेल्या सर्व्हरच्या समस्येसह इतर मागण्यांसाठी युवक काँग्रेस कडून तीव्र आंदोलन करण्यात आलं. वेळोवेळी तक्रार करूनही नोंदणी महानिरीक्षक नोंदणी कार्यालयातील सुरू असलेल्या कारभारावर लक्ष देत नाहीत. अनेक ठिकाणी बोगस दस्त नोंदणी सुरू असून देखील अधिकाऱ्यांवर ती कारवाई केली जात नाही, अशी तक्रार या युवकांची आहे. आमदार रवींद्र धंगेकर या आंदोलनात सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी या आंदोलनासह मराठा आरक्षणावर प्रतिक्रिया दिली.
आज सर्वपक्षीय नेत्यांची मराठा आरक्षणासंदर्भात बैठक बोलावली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजची सर्व पक्षीय बैठक आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलावलं आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटायला हवा. त्याअनुषंगाने सरकार योग्यरित्या काम करतंय. कोणावर ही अन्याय न करता, मराठा समाजाला आरक्षण देऊ.यासाठी सर्व घटकांना आणि विरोधी पक्षांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा करतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले.