कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी त्यांचे काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. एकत्र कुटुंब एकत्र आहे हा मेसेज देण्यासाठी बसलो नव्हतो. अजित पवार आणि त्यांची पत्नी आणि मूल राजकीयदृष्ट्या वेगळे झालेत. पण सगळं पवार कुटुंब एकत्र आहे. त्यांचं भाषण हे कारखान्याच्या सभेचं भाषण आहे, अस वाटत होतं. शरद पवारांनी त्यांना मोठं केलं. आता तेच पवारसाहेबांवर टीका करतात हे योग्य नाही, असं रोहित पवार म्हणालेत.
रोहित पवार यांच्या उमेदवारीसाठी आपण पुढाकार घेतल्याचा दावा अजित पवार यांनी केला आहे. शिवाय जर राष्ट्रवादीने रोहित पवारांना एबी फॉर्म दिला नसता तर जिल्हा परिषदेला रोहित अपक्ष उभा राहणार होता, असंही अजित पवार म्हणाले. यावर रोहित पवारांनी उत्तर दिलं आहे. काही गोष्टी खऱ्या आहेत काही खोट्या… अपक्ष लढायचं याची चर्चा नव्हती. एबी फॉर्म देण्याचे अधिकार हे शरद पवारांनी अजित पवारांना दिले होते. शरद पवारांना वाटत होत की आधी मी आमदार खासदार व्हावं. पण माझी इच्छा होती की खालच्या पदापासून सुरुवात करावी, असं रोहित पवार म्हणाले.
अजित पवारांचं राजकीय वर्चस्व असलं असतं तर तिथं 25 वर्ष भाजपचा आमदार नसला असता. मी दोन वर्षे आधी काम सुरु केलं होतं. हडपसरची चर्चा नव्हती. शरद पवारांनी सांगितलं की, अवघड मतदारसंघ निवड… माझ्या निवडणुकीच्या वेळी दादांनी सभा घेतल्या. त्याच फायदा मला झाला. मात्र आता अजितदादांनी घेतलेली भूमिका मान्य नाही, असं रोहित पवार म्हणाले.
अजित दादांच्या प्रचारासाठी माझी आई-काका फिरत होते. अजित दादा का या लोकांना विसरले? अजित पवार कुटुंबाला विसरत असतील. तर सामान्य लोकांना फाट्यावर मारतील. अजित दादांच्या मार्गदर्शनाखाली कारखाने त्यांचे मित्र एकत्र केले तर अदानी अंबानीच्या पण पुढे जातील, असंही रोहित पवार म्हणाले.