अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 05 फेब्रुवारी 2024 : सरसंघचालक मोहन भागवत यांनी राम मंदिराच्या उद्घाटनावर भाष्य केलं. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी उपस्थित राहता आलं, हे आपलं भाग्य असल्याचं मोहन भागवत म्हणाले. आपले श्रीराम 22 तारखेला आले. यासाठी अनेक संघर्ष झाले. अनेक पुरुषार्थ करण्यात आले. पण या पिढीच्या नशिबात रामचं दर्शन होतं. त्यांचं येणं होतं… प्रभू राम आले… ही देखील प्रभूची इच्छा होती. माझं भाग्य होतं की मला त्या सोहळ्याला उपस्थित राहता आलं, असं मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. ते आळंदीत बोलत होते.
भारत देशाला आपलं कर्तव्य करण्यासाठी उभं राहायचं आहे. आपल्याला एक संघ भारत निर्माण करायचा आहेतेही सृष्टी आणि निसर्गाला सोबत घेऊन आपण तो बनवूच. कुठल्याही अडचणी आल्या तर पळून जाऊ नका गीतेत देखील हेच सांगितलं आहे की कर्तव्य करा श्रद्धा आणि भक्ती आपल्यात आधीपासून आहे आपला देश श्रद्धेचा आहे. आपल्याला पुरुषार्थाची गरज आहे. कुठल्याही अपेक्षाशिवाय आपल्याला पुरुषार्थ करायचा आहे, असंही मोहन भागवत म्हणाले.
गोविंद गिरी महाराजांचा 75 वा अमृत महोत्सव सुरु आहे. गोविंद गिरी महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीत गीता भक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. सरसंघचालक प्रमुख मोहन भागवतांच्या हस्ते गीता भक्ती अमृत महोत्सवाचं उद्घाटन झालं. यावेळी मोहन भागवत यांनी उपस्थितांना संबोधित केलं. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत आळंदीत आजपासून संत महोत्सवाला देखील सुरुवात होणार आहे.
आज काल असे अनेक कार्यक्रम होत आहेत जी व्हावेत. अशी अनेक वर्षपासून आपल्या सगळ्यांची भावना आणि अपेक्षा होती. भगवतगीतेत देखील सांगितलं आहे की ती गोष्ट ज्या त्या वेळीच होते. आज आपल्या देशात अनेक मोठे कार्य असेच पार पडत आहेत. शिवाजी महाराजांनी देखील सांगितलं होत की हे राज्य व्हावे ही श्रीची इच्छा… सगळ्या गोष्टी वेळेवर होत आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी देखील पसायदानातून हेच सांगितलं आहे. महाभारतात अनेक प्रतिभा संपल्या आहेत. अनेक लोक संपले आहेत. ज्ञान नसेल तर अज्ञानाचा अंधकार असतो आणि त्यात विनाश निश्चित आहे, असं मोहन भागवत म्हणाले.