पुणे : आंबेगाव (Ambegaon) तालुक्यातील अवसरी येथील मोबाइलची (Mobile) दुकाने फोडून लाखो रुपये किंमतीचे मोबाइल चोरणारा अट्टल चोरटे, चोरीचे मोबाइल विकत घेणाऱ्यासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी अटक (Arrest) केले आहे. त्यांच्याकडून 3 लाख रुपये किंमतीचे तब्बल 123 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत. मंचर पोस्टे गु. र. नं 129/2022 भा. दं. वि कलम 457, 380नुसार फिर्यादी शशिकांत जयराम लोखंडे (वय 37, रा. पारगाव तर्फे अवसरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली की दिनांक 29 ते 30 मार्चरोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या मौजे पारगाव तर्फे अवसरी येथील ओम एंटरप्राइजेस या मोबाइल शॉपीचा पत्रा उचकटून दुकानामध्ये प्रवेश करून दुकानांमध्ये असलेले विविध कंपन्यांचे मोबाइल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले असल्याची फिर्याद दिली होती.
गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई
या गुन्ह्याचा तपास करत असताना अशाच प्रकारचे गुन्हे खेड शिक्रापूर या भागात यापूर्वी झाल्याचे गुन्हे शाखेच्या पथकाला समजले. त्यामुळे सदर गुन्ह्यांची लवकरात लवकर उकल करून आरोपींना अटक करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार आज रोजी गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत बातमी मिळाली, की शिरोली फाटा राजगुरुनगर येथे निखील पलांडे व सचिन मोहिते हे काही एक काम धंदा करत नसून त्यांच्याकडे नवीन मोबाइल विक्रीसाठी आहेत व ते शिरोली फाटा येथे नवीन मोबाईल घेऊन विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.
मोबाइल जप्त
मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिरोली फाटा राजगुरूनगर येथे जाऊन सापळा रचून संशयितरित्या वावरत असलेल्या निखिल विजय पलांडे (वय 26, रा. मुखई, ता. शिरूर, जि. पुणे), सचिन आत्माराम मोहिते (वय 33, रा. मुखई, ता. शिरूर, जि. पुणे) अशा दोघांना ताब्यात घेतले. दोघांपैकी एकाच्या पाठीवर काळ्या रंगाची मोठी बॅग मिळून आली. त्या बॅगची झडती घेतली असता त्यामध्ये विविध कंपन्यांचे नवीन मोबाइल मिळून आले. कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून विविध कंपन्यांचे रुपये 3, 04, 721 किंमतीचे 123 मोबाइल जप्त करण्यात आले आहेत.
आणखी वाचा :