पुणे : सरकार कारखानदारांचे आहे, त्यामुळे त्यांनी शेतकऱ्यांना मदत केली नाही, असा आरोप रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी केली आहे. काल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेऊन जे साखर कारखाने 1 मे नंतर ऊस गाळप करणार आहेत, त्यांना प्रति टन 200 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते. ते म्हणाले, की राज्यामध्ये 15 लाख प्रति हेक्टर ऊस (Sugercane) हा गाळपाविना राहणार आहे. त्या शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची घोषणा सरकारने करायला पाहिजे होती. पण हे सरकार कारखानदारांचे आहे. त्यांनी शेतकऱ्यांना मात्र मदत केली नाही. आता ऊसाची चिपाडे झालेली आहेत. ऊसाचे वजन घटले आहे, म्हणूनच ज्यांचा ऊस 1 मे नंतर जाईल त्या शेतकऱ्यांना (Farmers) प्रति टन 1000 रुपये अनुदान सरकारने देण्याची गरज होती, ते केले नाही, अशी टीका त्यांनी केली.
अतिरिक्त ऊसाच्या उत्पादनावर सरकार समाधानकारक तोडगा काढत नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सध्या अनुदान देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढावा, अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे. हे सरकार कारखानदारांना पोसणारे आहे का, असा सवाल त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना सरकार मारत आहे. शेतकऱ्यांचे फड पेटत आहेत. त्याच्यामध्ये माझा बळीराजा आत्महत्या करत आहे आणि हे निर्ढावलेले सरकार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहे, असा घणाघात त्यांनी केला आहे. दरम्यान, सरकारच्या या शेतकरी धोरणांविरोधात 20 मेला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली टेंभुर्णी (ता. माढा, जि. सोलापूर) येथे आंदोलन पुकारले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
राज्य सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी आणि कारखानदारांसाठी मोठा निर्णय घेतला. अतिरिक्त उसाचे गाळप करण्यासाठी सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. 1 मेपासून म्हणजेच अतिरिक्त ऊस गाळप अनुदान मिळणार आहे. उसाला 200 रुपये प्रति टन तर वाहतुकीसाठी 5 रुपये प्रति टन अशा स्वरुपात हे अनुदान असणार आहे. राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत 2.25 लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले.