अभिजीत पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 29 जानेवारी 2024 : पुण्यात आज एक वेगळी मुलाखत होत आहे. पुण्यात आज संजय राऊत यांची प्रकट मुलाखत होतेय. शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे या संजय राऊत यांची मुलाखत घेतायेत. पुण्यातील जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात सुषमा अंधारे संजय राऊत यांची मुलाखत घेत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दोन नेत्यांमध्ये आज पुण्यात रंगतेय. या मुलाखतीत सुषमा अंधारे राऊतांना प्रश्न विचारत आहेत. अंधारेंच्या प्रश्नांना संजय राऊत दिलखुलास उत्तरं देत आहेत.
सुषमा अंधारे यांनी पहिला प्रश्न विचारताच सभागृहात हशा पिकला. संजय राऊतसाहेब तुम्ही एवढं बोलता. भीती वाटत नाही का?, असा प्रश्न अंधारेंनी विचारला. त्याला संजय राऊतांनी उत्तरं दिलं.मी आशा व्यासपीठावर पक्षीय कधी नसतो. गेल्या 40 वर्षात माझ्यावर अनेक शिक्के लागले. कधी शरद पवारांचा माणूस तर कधी काँग्रेसचा माणूस… पण मी सच्चा शिवसैनिक आहे. मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे. मागच्या 40 वर्षांपासून मी शिवसेनेतच आहे. ज्या माणसाने 40 वर्षे बाळासाहेब यांच्यासोबत काढली त्याला भीती कशी वाटेल?, असं संजय राऊत म्हणाले.
आमचा अनेक लोकांना ईडीने बोलावलं आहे. मी त्यांना फोन केला. बिनदास्त जा मी पण जाऊन आलोय. मला कधी भीती वाटली नाही. राजकारणात ज्या ज्या भयंकर गोष्टी करायच्या आहेत. त्या सगळ्या मी केल्या आहेत. आमच्यासाठी शिवसेना हा राजकीय पक्ष नाही किंवा सत्ता घेण्यासाठीच साधन नाही, असं राऊत म्हणाले.
सार्वजनिक जीवनात भीती बाजूला खुंटीला टांगून ठेवावी लागते. आम्ही डोळ्याने रक्तपात आणि हिंसाचार पहिला आहे. आपला विरोधक एक तर जेलमध्ये टाकतो. गेल्या 5, 10 वर्षात जास्ती होत आहे, असंही राऊतांनी म्हटलं. एवढं बोलता मग भीती वाटत नाही का, या सुषमा अंधारेंच्या प्रश्नाला संजय राऊतांनी उत्तर दिलं.