पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून अनेक गुन्हेगारीच्या घटना घडत आहेत. पोर्षे हिट अँड रन प्रकरणानंतर एफसी रोडवर ड्रग्जचे सेवन करताना तरूणांचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दिवसाढवळ्या गुन्हेगारीच्या घटना होताना दिसत आहेत. आरोपींना पुणे पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा प्रश्न नागिरक करत आहेत. पुणे शहरातील प्रकरणानंतर सासवडमध्ये गोळीबाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. भर दिवसा झालेल्या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
पुरंदर तालुक्यातील सासवड येथे एक गोळीबाराची घटना घडली. या गोळीबार मध्ये एक जण गंभीर रित्या जखमी झालाय. तर या संदर्भात स्थानिक आणि प्रत्यक्षदर्शी लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सासवड येथील बस स्थानका समोर हा प्रकार घडला असून तीन हल्लेखोरांनी हा हल्ला केलाय. यावेळी एकावर गोळी झाडण्यात आलीय. गोळीबार यामध्ये 41 वर्षीय राहुल नामदेव टिळेकर हे गंभीर रित्या जखमी झाले.
पुणे येथील एका रुग्णालयात उपचारासाठी राहुल टिळेकर यांना नेण्यात आलं आहे. सासवड एसटी बस स्थानकासमोर टिळेकर हे आईस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करतात अशी प्राथमिक माहिती मिळतेय. दुपारी चार वाजलेच्या दरम्यान ही घटना घडलीय. घटना घडल्यानंतर सासवड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या संदर्भातील अधिकचा तपास सासवड पोलीस करत आहेत.
दरम्यान, राहुल टिळेकर यांच्यावर तीन हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्ला केल्यावर तिथून ते पसार झाले असून पोलीस त्यांचा तपास करत आहेत. हा हल्ला कोणत्या कारणावरून झाला? फरार हल्लेखार कोण आहेत? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.