येत्या 11 तारखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत सासवडला सभा होणार आहे. ही सभा नाही तर जनसंवाद आणि शेतकऱ्यांशी संवाद असणार आहे. एखादी गोष्ट युद्ध करून जिंकून मिळवता येते. परंतु तहात मिळत असेल तर युद्ध करण्याचं कारण नाही… पुरंदरच्या जनतेच्या हितासाठी मी लढतोय. त्या प्रश्नांचं सामोपचाराने ही काम झालेलं आहे. 11 तारखेला 50 हजार लोक सभेला येतील. या आधी सुद्धा सासवडला ज्या मोठ्या सभा झालेल्या आहेत. त्या शिवसेनेच्या आणि माझ्या झालेल्या आहेत, असं शिवसेनेचे नेते विजय शिवतारे म्हणाले.
बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा विजय शिवतारे यांनी काही दिवसांआधी केली होती. काहीही झालं तरी माघार घेणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. मात्र त्यांनी माघार घेतली. ही माघार का घेतली? याबाबत विचारलं असता शिवतारेंनी उत्तर दिलं. मी माघार घेतली याचा कारण ही महायुती जिंकली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळं ऐकून घेऊन त्यातून मार्ग काढले.
पुरंदरचं एअरपोर्ट, गुंजवणीचं पाणी यांसारख्या ज्या ज्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्या. त्या स्वतः मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस जनतेला सांगतील. माघार घेताना काय काय ठरलं हे स्वतः त्या ठिकाणी ते सांगतील. आमच्या पुरंदरच्या लोकांच्या हिताचे प्रश्न आहेत. वैयक्तिक माझ्या बाबतीतले कुठलेही प्रश्न नाहीत. विधानसभा अजून लांब आहेत. विधानसभेबाबत नेत्यांना काय बोलायचं असतील तर ते बोलतील, असं सूचक विधानही विजय शिवतारे यांनी केलं आहे.
11 तारखेची सभा ही टोलेजंग ऐतिहासिक सभा होईल. त्या सभेचा आज नियोजन झालं. नियोजनासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक आले होते. ठरलेलं महायुतीचं काम आम्ही चोख करू. उद्या सकाळी 11 वाजता महायुतीचे सर्व नेत्यांची बैठक सासवडला ठेवली आहे. त्यामध्ये सुद्धा सगळ्यांचं ऐकून नियोजन करण्यात येईल. महायुतीच्या उमेदवाराचा शंभर टक्के मोठ्या मताधिक्याने विजय होईल, असा विश्वास विजय शिवतारे यांनी व्यक्त केला आहे.