पुणे : राज ठाकरेंनी (Raj Thackeray) चिथावणीखोर वक्तव्य केले आहे. राज ठाकरेंना हिंदुत्वाचे (Hindutwa) राजकारण करायचे आहे. हे भाजपाचे राजकारण आहे, अशी टीका सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाने (Social Democratic Party of India) केली आहे. अंगावर आलात तर शिंगावर घेऊ, असा इशाराही एसडीपीआयनं राज ठाकरेंना दिला आहे. पुण्यातील पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. मशिदींवरील भोंग्यांसदर्भात एसडीपीआयचे राज्य सचिव अझहर तांबोळी यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेवर टीका केली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावरही निशाणा साधला. संजय राऊत म्हणतात, की ते हिंदू ओवैसी आहेत. तर मग जसे ओवैसींना रोखण्यासाठी प्रयत्न केले, तसे तुम्ही राज ठाकरेंना काय रोखण्यासाठी काय करत आहात, असा सवाल तांबोळी यांनी केला आहे. राज ठाकरेंवर गुन्हा दाखल का होत नाही, असेही तांबोळी यांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून विचारले आहे.
अझहर तांबोळी यांनी यावेळी मशिदींवरील भोंग्यांवरून होणाऱ्या राजकारणावर टीका केली. मशिदींच्या समोर भोंगे तुम्ही लावा, आम्ही भोंगे वाजवू, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. हिंदू ओवैसींना रोखण्यासाठी प्रयत्न करा, असेही ते यावेळी म्हणाले.
अझहर तांबोळी म्हणाले, की आम्ही मुस्लीम समाजाच्या बाजूने आहोत. मुस्लीम समाजाला व्हिक्टीम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर ते हिंदू ओवैसी आहेत तर त्यांना दाबून ठेवा. सगळे निर्बंध मुस्लीम समाजावर का? आम्ही घटनात्मक मार्गांने उत्तर देणार. पण अंगावर आलात तर सोडणार नाही, असा इशारा एसडीपीआय पार्टीच्या अझहर तांबोळी यांनी दिला आहे.