पुणे : पुण्यात कोरोना लसीची निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला (Serum Institute Building) भीषण आग लागली. या आगीत पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली. पुण्यातील मांजरा परिसरात असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटची नवीन इमारतीत आज दुपारी आग लागली होती. या आगीवर जवळपास तीन तासांनी नियंत्रण मिळवण्यात यश आलं. कोव्हिशील्ड (Covishield Vaccine) या कोरोना विषाणूवरील लशीची निर्मिती सीरम इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात येते. गुरुवारी (21 जानेवारी) दुपारी दोन वाजता इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागल्यानंतर परिसरात धुराचे मोठे लोट पसरत गेले. अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. (Pune Serum Institute Building Fire)
जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.
बीसीजी लसीचे उत्पादन सुरू असलेल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या मांजरी येथील नव्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमारास आग लागली. दोन वाजून 37 मिनिटांनी अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना आगीची माहिती मिळाली. जवानांकडून तिघा कामगारांची सुटका करण्यात आली, तर अनेक कर्मचाऱ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. सुदैवाने आगीत कुठल्याही जीवितहानीचं वृत्त नाही.
ज्या बिल्डिंगला आग लागली त्या इमारतीत BCG लस बनवण्याचं काम चालतं. मात्र या इमारतीत मोठ्या प्रमाणात साठा नव्हता. त्यामुळे मोठं नुकसान झालेलं नाही, अशी प्राथमिक माहिती मिळत आहे.
पुण्याच्या माजी महापौर आणि भाजप आमदार मुक्ता टिळक यांनी घातपाताचा संशय व्यक्त केला आहे. “दीडच्या सुमारास आग लागल्याची माहिती आहे. कोव्हिड लसीच्या इमारतीला आग लागलेली नाही, त्यामुळे लस सुरक्षित आहे. जीवितहानी नाही. हा घातपाताचा प्रकार असल्याचं प्रथमदर्शनी वाटतंय. कारण ज्या ठिकाणी आग लागलीय, त्या परिसरात कोरोना लस बनवण्याचं काम सुरु आहे. हा घातपाताचा प्रकार असल्याची मला शंका आहे” असा संशय मुक्ता टिळक यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना व्यक्त केला.
पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून पुण्याला जाऊन सीरम इन्स्टिट्यूटमधील आग लागलेल्या घटनास्थळाला भेट देणार आहेत. अजित पवारांनी आग लवकरात लवकर विझवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. पुणे जिल्हाधिकारी राजेश देशमुख आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडून दूरध्वनीवरुन परिस्थितीची माहिती घेतली. संस्थेतली अडकलेल्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय मदत करण्याचे आदेश दिले होते. केंद्रीय तपास यंत्रणांकडूनही आगीची दखल घेण्यात आली असून गृह विभागाला आगीचा अहवाल सादर करण्यात येणार आहे.
ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकाच्या ‘कोव्हिशील्ड’ लसीचे उत्पादन पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये होत आहे. देशात या लसीच्या आपत्कालीन वापराला परवागनगीही मिळाली असून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. कोव्हिशील्ड लसीचे डोस 11 जानेवारीला पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लसीचे काही डोस देशातील प्रमुख 13 शहरांमध्ये रवाना झाले.
पोलिसांच्या मोठ्या फौजफाट्यात पुणे विमानतळावरुन लसीचे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये पाठवण्यात आले. यामध्ये औरंगाबाद, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद, गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वर या शहरांचा समावेश आहे.
संबंधित बातम्या
कोरोना लसीचे डोस ‘सीरम’मधून रवाना, पोलीस उपायुक्त नम्रता पाटलांच्या हस्ते पूजा
(Pune Serum Institute Building Fire)