लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तिसऱ्या टप्प्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील भोरमध्ये महाविकास आघाडीची सभा होत आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, नाना पटोले, सुनील केदार, अमोल कोल्हे, संग्राम थोपटे यांच्या उपस्थितीत ही सभा होत आहे. या सभेत बोलताना शरद पवार यांनी स्थानिकांना आवाहन केलं आहे. गेले काही दिवस मी महाराष्ट्रमध्ये फिरत आहे. त्याठिकाणी जाऊन भूमिका मांडली आणि मला आनंद आहे की, लोकांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे, असं शरद पवार म्हणाले.
या देशात अनके राजेराजवाडे होऊन गेले. त्यांनी इतिहास निर्माण केला. हे राज्य जनतेचे आहे. राजेराजवाड्यांची सत्ता लोकशाहीमध्ये राहिली नाही. अनेक राजे होऊन गेले पण यापैकी छत्रपती शिवाजी महाराज यांचं नावं आजपर्यंत घेतलं जातं. हे जनतेचं राज्य आहे. आज देशाच्या राजधानीतले अरविंद केजरीवाल राज्यकर्ते होते. ते जेल मध्ये पाठवले. जनता उत्तर देईल. तुम्हा सर्वाना विनंती करतो सुप्रिया सुळे यांना प्रचंड मताने विजयी करा, असं आवाहन शरद पवार यांनी भोरकरांना केलं.
नाना पटोले यांनीही भोरच्या सभेला संबोधित केलं. दुसऱ्यांची घर फोडणारी या देशात निर्माण झाली. पण सामान्य जनता आमच्या मागे उभी आहे. महाराष्ट्रात 45 जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील असं चित्र आज आहे. हे राजकीय अग्निवीर झाले आहेत. हे अग्नीवीरवाले भोरमधील जे हॉटेल मालक माविआकडे आहेत त्यांना धमकवतात. पोलिसांमार्फत धमक्या दिल्या जातात. अनेक हॉटेल मालकांचे मला फोन आले. देशभरातील 72 हजर कोटीची शेतकऱ्यांची कर्ज मनमोहन सिंग, शरद पवारसाहेब आणि आमचं सरकार असताना माफ झाली, असं नाना पटोले म्हणाले.
हजारो कोटी खर्च करून काहीही गरज नसताना नवीन संसद इमारत बांधली, ही तानाशाही आहे. सगळं विकून देशाला कर्जबाजरी केलं. त्यामुळे लोक आमच्या पाठिशी आहेत. त्यामुळे 5 लाखांच्या मताधिक्याने सुप्रिया सुळे निवडून येतील. तुतारी पंजाने पकडली जाते. पंजा आणि तुतारीचीला मजबूत पकडण्यासाठी आहे, असं नाना पटोले म्हणाले.