सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांनी मतदारसंघासाठी निधी आणला नसल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केलं होतं. याला शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. आज काही लोक सांगतात, लोकसभेत जायचं नुसतं जाऊन काय उपयोग? निधी आणावा लागतो… आज मला विधानसभा, लोकसभा आणि राज्यसभा या तीन ठिकाणी जाऊन 56 वर्षे झाली. हिंदुस्थानच्या राजकारणात असा एक ही माणूस नाही की, ज्याने या सभागृहात सलग 56 वर्षे पूर्ण केली असतील. चांगलं काम करणारा जागृक सभासद असेल तर निधी मिळतो. ती जागृकता अमोल कोल्हे यांच्यामध्ये आहे, असं शरद पवार म्हणाले.
लोकसभेत गेल्यावर सत्ता आवश्यकच असते, असं नाही. सत्ता नसताना ही काम करता येत फक्त जागरूक सभासद म्हणून तुमचा लौकीक झाला पाहिजे. पुणे जिल्ह्यातून ग्रामीण भागातून दोन खासदार आहेत. ज्यांचं नाव देशातील लोकसभेत घेतलं जातं. एक माझी मुलगी सुप्रिया सुळे आणि दुसरे डॉ. अमोल कोल्हे…, असं म्हणत शरद पवार यांनी सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या कामाचं कौतुक केलं आहे.
नुसतं शेती एके शेती करून चालणार नाही. रांजणगावला जी जमिन दिसतेय. ती जिरायत असताना मला अस्वस्थ करायची. नंतर तिथे येऊन बैठक घेतली एमआयडीसी केली. स्थानिक लोकांनी सहकार्य केल्यानंतर काय होत याच उत्तम उदाहरण शिरूर रांजणगाव औद्योगिक वसाहत आहे. अनेक कामे होऊ शकली ती तुमच्या सहकार्यामुळे आणि पाठींब्यामुळे…, असंही शरद पवार म्हणाले.
सरकारमध्ये या तालुक्याला कमी संधी दिली, असं म्हटलं जातं. हे खरंय गेली अनेक वर्ष आंबेगावला वळसे पाटलांना मंत्रिपद दिलं गेलं. शिरूरला कमी संधी मिळाली, हे मी मान्य करतो. पण आता एक गोष्ट चांगली झाली चार पैकी तीन जणांनी आपला रस्ता बदलला. पण आता शिरूरला मंत्रिपदाची संधी मिळेल. अशोक पवारांच काम चांगलं त्यांना संधी मिळेल, असं म्हणत शरद पवारांची अशोक पवार यांच्या मंत्रिपदाबाबतची मोठी घोषणा केली आहे.