योगेश बोरसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 11 मार्च 2024 : यंदा देशात सार्वत्रिक लोकसभा निवडणूक होतेय. अशात राज्यातील राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हा त्यांच्यासोबत अनेक आमदार, खासदार, राष्ट्रवादीचे नेते गेले आहेत. मात्र या नेत्यांपैकी काही जण परत शरद पवार गटात येणार असल्याची चर्चा होत आहे. पारनेरचे आमदार निलेश लंके शरद पवार गटात पक्षप्रवेश करणार आहेत. तसंच निलेश लंके अहमदनगर दक्षिणमधून लोकसभा लढवणार असल्याची माहिती आहे. यावर पुण्यातील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी स्पष्ट भूमिका मांडली.
निलेश लंके पुन्हा तुमच्या बाजूला येणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत काय सांगाल? त्यांचा पक्ष प्रवेश आज होणार असल्याची चर्चा आहे, असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा या चर्चेला काही अर्थ नाही. निलेश लंकेंबाबत मला ठाऊक नाही. ही चर्चा मी तुमच्याकडूनच ऐकली आहे. असे अनेक लोक आहेत. त्यांना सगळ्यांना विचारत बसणार का?, असं शरद पवार म्हणाले.
रोहित पवारांच्या बातमीत देखील त्यांच्या कारखान्याच्या जप्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आलीय. अवसायानात निघालेले निम्म्याहून अधिक कारखाने पंचवीस कोटीहून कमी रकमेला विकले गेले. रोहित पवारांच्या कंपनीने कारखाना पन्नास कोटींना विकला गेला. ईडी च्या पाच हजार केसेसपैकी फक्त पंचवीस केसेसचा निकाल लागलाय. त्यातील किती प्रकरणात लोक दोषी आढळलेत याचे प्रमाण शुन्य टक्क्यांहून कमी आहे. ईडीने कारवाई केलेल्यांपैकी एकही व्यक्ती भाजपचा नाही. सगळेच विरोधी पक्षातील आहेत, असं शरद पवार म्हणाले.
2004 ते 2014 या कॉंग्रेसच्या सत्तेच्या कालावधीत ईडीने 26 कारवाया केल्या. त्यातील 4 नेते कॉंग्रेसचे होते तर तीन नेते भाजपचे होते. याचा अर्थ कॉंग्रेसच्या सत्ताकाळात ईडीचा गैरवापर होत नव्हता. ईडीचा उपयोग दहशत निर्माण करण्यात येतंय, असं पवार म्हणाले. रोहित पवारांना अटक होईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. याबाबत भरवसा नाही. कारण अनिल देशमुख आणि संजय राऊत यांना देखील अटक करण्यात आली होती, असं शरद पवार म्हणाले.