पुण्याच्या ओतूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार यांनी ‘त्या’ चुकीवर भाष्य केलं. मी माझ्या राजकीय जीवनात खूप मोठी चूक केली. अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन खासदार केलंय आता हीच माझी चूक तुम्ही सुधारा… हे आवाहन करण्यासाठी मी इथं आलोय, असं अजित पवार म्हणाले. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका करताना दिसतात. आजही जाहीर सभेतून अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.
राजेश टोपे सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र घेऊन शरद पवारांकडे गेले होते. आम्ही ही सगळे त्रासून होते, त्यामुळं पवार साहेब म्हणाले मी राजीनामा देतो. भावनिक राजकारण, हेच नकोय. एक जण तर म्हणाला अजित पवारांना शरद पवार साहेबांनी संधी दिली नसती तर अजित पवार म्हशी सांभाळत असते. अरे बाबा सांभाळले असते. त्यात काय, मी पण शेतकऱ्यांचा पोरगा आहे, असं अजित पवार म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. ते येण्यापूर्वी माझं भाषण झालं होतं. त्यानंतर मोदीसाहेब आले. मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले. मग मी माझ्या खुर्चीवरून उठलो अन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो. तात्पुरता बसलो बरं का…. मोदी साहेबांना कांदा निर्यातीचा प्रश्न सांगितला. निर्यातबंदी हटविण्याची विनंती केली. पुढं काय घडलं ते पाहिलं तुम्ही, असं अजित पवार ओतूरच्या सभेत म्हणाले.
जुन्नर तालुक्यातील काळवाडी इथं बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यु झालेल्या रुद्रला अजित पवारांनी श्रद्धांजली अर्पण केली. लवकर बिबट्याचा बंदोबस्त करतो, असं अजित पवारांनी भर सभेत आश्वासन दिलं. बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. दिवसा वीज पुरवठा व्हावा, यासाठी मी पाठपुरावा करेन. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचे जीव गेलेत. एखाद्याचा जीव जायला नको. यासाठी पिंजरे लावण्याची गरज आहे. वीज रात्रीऐवजी दिवसा द्यायला हवी. याबाबत पाठपुरावा करत राहीन. पण बिबट्याच्या बाबतीत राजकारण कसे काय करतात. ते खासदार तर नुसती डायलॉगबाजी करतात, असं अजित पवार म्हणाले.