सुनिल थिगळे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, शिरूर -पुणे | 05 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अशात विरोधकांवर आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. राज्यात चर्चेत असणाऱ्या मतदारसंघांपैकी एक म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ… या मतदारसंघात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली आहे. अमोल कोल्हे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी त्या खासदारांचे नाव जाहीर करावं, असं खुलं आव्हान शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटलांनी दिलंय.
स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसाठी अमोल कोल्हे यांनी अनेकांचे उंबरे झिजवले. पण त्यावेळच्या एका खासदाराने मला सांगितलं की काहीही केलं तरी पैसे फिटणार नाहीत, असं सांगितलं, असं वक्तव्य अमोल कोल्हे वारंवार करताना दिसतात. आता ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी पुन्हा वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना महायुतीकडून कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यास इच्छुक असणाऱ्या आढळराव यांनी हे खुलं आव्हान दिलं आहे.
अमोल कोल्हे हे फिल्मी डायलॉग बाजी करणारे खासदार आहेत. ते फक्त धाकल्या धन्याच नाव घेवून पैसे कमावतात. हे त्यांना शोभत नाही! छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे आमच्या जिव्हाळ्याचे आहेत. ते आमचे आदरस्थान आहेत. पण अमोल कोल्हे तुम्ही उगाच बोलून व्यापारासाठी, धंद्यासाठी निवडणुकीसाठी उपयोग करू नका, असं म्हणत माजी खासदार, शिंदे गटाचे नेते शिवाजी आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांना खोचक टोला लगावला आहे.
शिरूरमध्ये अमोल कोल्हे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अशात अमोल कोल्हे यांना अजित पवार यांनी चॅलेंज दिलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे कोल्हे यांच्या विरोधात निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. आढळराव पाटील राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.