प्रदीप कापसे, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 22 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. सगळ्यात आधी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची माफी मागतली पाहिजे. शरद पवार काय मंत्रिमंडळात नव्हते. आज देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर जे सहकारी आहेत हेच लोक आधी सरकारमध्ये होते. गैरसमज पसरवला म्हणून त्यांनी माफी मागितली पाहिजे. मला देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल सहानुभूती आहे की मुख्यमंत्री असणार माणूस हा उपमुख्यमंत्र झाला आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे.
शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे आज एकाच मंचावर येणार आहेत. त्यावरही सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या कार्यक्रमाला पवार कुटुंब उपस्थित राहणार आहे. विद्या प्रतिष्ठानमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. माझ्या काकांच्या नावाने संस्था उभी राहत आहे. राज्यात अनेक अशा संस्था आहेत. सामाजिक बांधिलकी काय आहे की नाही? कुटुंब म्हणून आम्हीसोबत आहोत, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जर त्यांच्या बैठकांना भाजपचे आमदार जात नसतील तर तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्याला माझा काय संबंध? मी माझ्या मतदारसंघात काम करते, असं म्हणत अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीवर सु्प्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आजच्या घडीला भाजपत खरं बोलणारा एकच नेता आहे. ते म्हणजे नितीन गडकरी… त्यांचं बोलणं म्हणजे मनातली खदखद नाही, तर ते खरं बोलत आहेत, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात. बाजारात दोन प्रकारचे माल मिळतात एक डुप्लिकेट आणि ओरिजनल.त्यामुळे खरी शिवसेना कोणाची आहे हे लोकांना माहिती आहे, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी शिंदेगटाला टोला लगावला आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा होतोय. त्यासाठी ठाकरे गटाकडून या मेळाव्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आलाय. त्यावर बोलताना महाराष्ट्र दिल्ली पुढे कधी झुकला नाही, ना कधी झुकेल. जर टीझर मध्ये त्यांनी तसं म्हटलं असेल तर माझं त्याला समर्थन आहे, असं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.