पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात सकाळी 11 वाजेपर्यंतच किराणा दुकाने सुरु ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे बाजारपेठेला जवळपास 60 ते 70 टक्के आर्थिक फटका बसला आहे. 1 जूननंतर दुकाने सुरु ठेवण्याची वेळ वाढवून द्यावी अशी मागणी, व्यापारी वर्गातून जोर धरत आहेत. (Pune Traders demands to let shops open after 11 am after 1st June)
मार्केट यार्डातील भुसार व्यापाऱ्यांना फटका
पुण्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग कमी होत आहे. त्यामुळे 1 जूनपासून सर्व प्रकारच्या दुकानांची वेळ वाढवावी अशी मागणी मार्केट यार्डातील भुसार व्यापारी करत आहेत. किराणा दुकानं सकाळी फक्त अकरा वाजेपर्यंत सुरु असतात, त्याचबरोबर जिल्हाबंदी असल्याने किरकोळ व्यापाऱ्यांना खरेदीसाठी मार्केटयार्डात येणे शक्य होत नाही. याचा आर्थिक फटका मार्केट यार्डातील भुसार व्यापाऱ्यांना बसत आहे.
व्यापाऱ्यांवर जवळपास 70 टक्के परिणाम
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून व्यापाऱ्यांवर जवळपास 70 टक्के परिणाम झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने नियमांसह दुकाने सुरु ठेवण्याची वेळ वाढवावी, अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली आहे. सरकारने लॉकडाऊन आणखी वाढवल्यास व्यापाऱ्यांचे हाल होतील, असं कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया यांनी याआधीही म्हटले होते.
50 लाख लोकांचा रोजगार धोक्यात
यापूर्वी पुणे आणि मुंबईतील व्यापाऱ्यांनीही ठाकरे सरकारकडे 1 जूनपासून दुकाने उघडण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. 31 मेपर्यंत दुकाने बंद राहिल्याचा कालावधी 55 दिवसांचा होईल. त्यामुळे तब्बल 50 लाख लोकांचा रोजगार धोक्यात आहे. परिणामी राज्य सरकारने 1 जूनपासून दुकाने सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी एफआरटीडब्ल्यूचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केली होती.
ठाकरे सरकारकडून मागणीवर विचार
व्यापाऱ्यांनी यापूर्वी 15 मे नंतर लॉकडाऊन वाढवण्यास विरोध केला होता. मात्र, मुंबई वगळता राज्याच्या इतर भागांमध्ये कोरोनाचा धोका कायम असल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यापाऱ्यांची ही मागणी मान्य केली नव्हती. त्यामुळे राज्यातील व्यापारी समाज नाराज झाला होता. मात्र, कोरोना आणि म्युकरमायकोसिस या दुहेरी संकटामुळे ठाकरे सरकार कोणताही धोका पत्कारायला तयार नाही.
संबंधित बातम्या:
आम्ही सर्व नियम पाळतो, पण 1 जूनपासून दुकाने उघडू द्या; व्यापाऱ्यांची ठाकरे सरकारला कळकळीची विनंती
‘मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन फक्त ‘ज्ञान’ देतात, आता काहीही कारवाई करा, पण 1 जूनपासून दुकानं उघडणारच’
(Pune Traders demands to let shops open after 11 am after 1st June)