पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह अनेक विद्यापीठांमधील ऑनलाईन परीक्षेचा सावळा गोंधळ मागील वर्षी संपूर्ण राज्याने पाहिला. त्या पार्श्वभूमीवर यंदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या सत्र परीक्षा या 10 एप्रिलपासून सुरु होणार असल्या तरीही त्याबाबतची सराव परीक्षा 5 एप्रिल ते 9 एप्रिल या कालावधीत घेण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पध्दतीने घेतल्या जाणाऱ्या मुख्य परीक्षेचा सराव करत त्याचे तंत्र समजावून घेता येणार असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलीय. (Savitribai Phule Pune University will have online practice exam before the main exam)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून एक परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे. त्यामध्ये विद्यापीठाच्या परीक्षेबाबतची माहिती देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाने सत्र परीक्षा ऑनलाईन पध्दतीने घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही ऑनलाईन परीक्षा नेमकी कशी असेल याची तांत्रिक बाजू विद्यार्थ्यांना समजण्याच्या दृष्टिकोनातून सराव परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला गेला आहे. 5 ते 9 एप्रिल दरम्यान सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळात ही सराव परीक्षा होणार आहे.
गोंधळ टाळण्यासाठी मोठी खबरदारी
दरम्यान विद्यापीठाच्या पहिल्या सत्र परीक्षांचे वेळापत्रक टप्याटप्याने विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येत आहे. ही परीक्षा संपूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार असून बहुपर्यायी स्वरूपात असणार आहे. प्रथम वर्ष ते अंतिम वर्षाच्या परिक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या नोंदणीकृत इ मेल आयडीवर आणि मोबाईल क्रमांकवर माहिती देण्यात येईल. sppuexam.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना सूचना, युजर मॅन्युअल आणि व्हिडीओच्या माध्यमातून परिक्षेविषयी माहिती दिली आहे. तसंच विद्यार्थ्यांना काही अडचणी असल्यास हेल्पलाईन 020- 71530202 क्रमांकही देण्यात आला आहे.
पुण्यात पुढील सात दिवसांसाठी अंशत: लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. बस, धार्मिक स्थळं, हॉटेल सेवा पुढील सात दिवसांसाठी बंद राहील. उद्यापासून पुढील सात दिवस हे नियम लागू राहतील. तसेच दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार असल्याचे राव यांनी स्पष्ट केले.
सौरभ राव यांनी सांगितले की, दहावी, बारावी आणि एमपीएससी परीक्षा नियोजित वेळेत होणार आहेत. त्यात कोणताही बदल केला जाणार आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालये 30 एप्रिल पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यासंदर्भात पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा परिस्थितीचा आढावा घेतला जाईल, असेही राव यांनी यावेळी स्पष्ट केले. व्यायामशाळा सुरु राहतील. पुण्यात दिवसभर जमावबंदी लागू करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :
Pune Lockdown Update | पुण्यात अंशतः लॉकडाऊन, भयावह स्थिती दाखवणारी आकडेवारी
Pune Lockdown : पुण्यात मिनी लॉकडाऊन, वाचा संपूर्ण नियमावली
Savitribai Phule Pune University will have online practice exam before the main exam