अभिजित पोते, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, पुणे | 21 मार्च 2024 : मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर वसंत मोरे यांची भूमिका काय असणार याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. अशातच वसंत मोरे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना मोठं विधान केलं आहे. राज ठाकरे महायुतीत सामील होणार असल्याचं दिसतं आहे. राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या वारंवार बैठका होत आहेत. यावरही वसंत मोरे यांनी प्रतिक्रिया दिलीय. राज ठाकरे महायुतीत जातील की नाही हे मला माहिती नाही. मी त्या पक्षातून बाहेर पडलो आहे. पण मनसेचे पुण्यातले जे साहेब लोक आहेत. त्यांना याबद्दल विचारा…, असं म्हणत वसंत मोरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना टोला लगावला आहे.
लोकसभा निवडणूक लढण्यावर वसंत मोरे ठाम आहेत. मी लोकसभा निवडणूक लढणार आहे. पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही. मुंगी कितीही लहान असली तरी हत्तीचा चावा घेऊ शकते. अनेक मुद्दे घेऊन मी पुणेकरांसमोर जाणार आहे. सभेतून मुद्दे मांडणार आहे. मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजप नेते बोलले की ही निवडणूक एकतर्फी करू… पण पुणेकर कधीच कुणाला एकतर्फी निवडणून देत नाहीत, असं वसंत मोरे म्हणालेत.
रवींद्र धंगेकर यांना शुभेच्छा त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं. तर ते आमदारकीवरून खासदारकी लढवतील मी अजूनही लोकसभेच्या रिंगणात आहे. मी निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा!, असा निर्धार वसंत मोरे यांनी बोलून दाखवला.
वसंत मोरे यांनी काही वेळा आधी एक पोस्ट शेअर केलीय. यात त्यांनी लोकसभा निवडणूक लढण्यावर ठाम असल्याचं म्हटलं आहे. तरीपण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी… अशी एक पोस्ट त्यांनी सकाळी शेअर केली होती. त्यानंतर त्यांना आलेला एक अनुभव मोरे यांनी काही वेळाआधी शेअर केलाय.
कुठपर्यंत पोहोचला राम राम गेली 21 वर्ष मी सातत्याने श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जात असतो. नेहमीप्रमाणे आजही सकाळी मी नारायणपूरला गेलो. दर्शन झाल्यानंतर मी त्या ठिकाणी मंदिरा बाहेर बसणाऱ्या भिक्षुक लोकांना सातत्याने काही दक्षना देत असतो. त्यापैकी एका बाबांनी मला एक पेपरचे कात्रण दिलं. मला बोलले मी तुमची आज वाटच बघत होतो. ही घ्या तुमची बातमी… म्हणजे वसंत मोरेचा राम राम कुठपर्यंत पोहोचलाय याचा थोडा अभ्यास करा खासदार तर मीच होणार …!
“कुठपर्यंत पोहोचला राम राम * गेली 21 वर्ष मी सातत्याने श्री क्षेत्र नारायणपूर या ठिकाणी दत्तगुरूंच्या दर्शनासाठी जात असतो नेहमीप्रमाणे आजही सकाळी मी नारायणपूरला गेलो आणि दर्शन झाल्यानंतर मी त्या ठिकाणी मंदिरा बाहेर बसणाऱ्या भिक्षुक लोकांना सातत्याने काही दक्षना देत असतो त्यापैकी pic.twitter.com/A7SyyN5kyL
— Vasant More | वसंत मोरे (@vasantmore88) March 21, 2024