पुणे : पुण्यातील वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणाऱ्या तरुणींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अभिनेते रमेश परदेशी यांनी हा व्हिडिओ त्यांच्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केला होता. दरम्यान या व्हिडीओनंतर पुण्यातील तरूणाई ड्रग्जच्या विळख्यात सापडलीय का? असा सवाल उपस्थित होतोय.
पुण्याच्या वेताळ टेकडीवर नशेत गुंग असणाऱ्या या दोन तरूणी. अभिनेते रमेश परदेशींनी हा व्हिडिओ शेअर करत हे भयानक वास्तव समोर आणलंय. या व्हिडीओत एक तरुणी बेशुद्ध अवस्थेत पडलेली आहे. तर दुसरी तरूणी ही नशेत बडबड करताना दिसतेय. अभिनेते रमेश परदेशींनी समोर आणलेल्या व्हिडीओनंतर विरोधकांनी सरकारवर टीकास्त्र डागलंय. पुण्यातील तरूण-तरूणी नशेच्या विळख्यात सापडणं हे दुर्दैवी असल्याचं अंबादास दानवेंनी म्हटलंय. राज्यातून ड्रग्जला हद्दपार करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी भूमिका घेतल्यास राजकीय मतभेद विसरून मदत करु असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं. तर भूमिका घेतल्यामुळेच ड्रग्ज सापडत असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं कुरकुंभमधील कारखान्यावर धाड टाकत 1100 कोटींचं 600 किलो ड्रग्ज जप्त केलं होतं. दरम्यान याप्रकरणात आतापर्यंत देशभरातून 3 हजार 600 कोटींचं 1800 किलो मेफेड्रॉन जप्त केलंय.
जवळपास साडेतीन हजार कोटींचं ड्रग्ज पुणे पोलिसांनी जप्त केलंय. मात्र, या ड्रग्जचं पुणे ते लंडन असं कनेक्शनही उघडकीस आलं आहे. या संपूर्ण रॅकेटचा मास्टरमाईंड हा संदीप धुनिया नावाचा व्यक्ती आहे, कोण आहे संदीप धुनिया? मुळचा बिहारचा असणारा संदीप धुनिया हा सध्या ब्रिटिश नागरिक आहे. 2016 मध्ये धुनिया ड्रग्जच्या प्रकरणात येरवडा जेलमध्ये होता. जेलमध्ये असताना धुनियानं ड्रग्जचं नेटवर्क तयार केल्याचा दावा केला आहे.
दरम्यान या ड्रग्जचं रॅकेट कशा पद्धतीनं चालत होतं. त्यावर देखील एक नजर टाकुयात. पुण्यातून मेफेड्रॉन मिठाच्या पॅकेट्समध्ये घालून टेम्पोतून ठिकठिकाणी पाठवलं जायचं. किती मेफेड्रॉन हवंय, याची माहिती संदीप धुनियाकडून युवराज भुजबळला दिली जायची. 50 किलो मिठाच्या पॅकमध्ये किंवा रांगोळीच्या पुड्यात 4 किलो मेफेड्रॉनचे पॅकेट टाकले जायचे. भारतातल्या पंजाब हरियाणा अशा विविध ठिकाणी हे ड्रग्ज पोहोचवलं जात होतं. परदेशातही या ड्रग्जची विक्री केली जात असल्याची माहिती, परदेशात मेफेड्रॉन पाठवण्यासाठी कुरियर सिस्टिमचा वापर केला जात होता. या प्रकरणात पोलिसांनी दिल्लीतून अटक केलेले दिवेश भुतिया आणि संदीप कुमार या दोघांची फूड कुरियर सर्व्हिस होती.
सांस्कृतिक शहर ओळख असलेलं पुणे हे ड्रग्जच्या विळख्यात सापडलं आहे. ललित पाटील प्रकरणातही पुण्यातून हजारो कोटींचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. दरम्यान आताही पुणे पोलिसांनी 3 हजार 600 कोटींचं ड्रग्ज जप्त करत कारवाई केलीय. मात्र, पुण्यासह देशात या ड्रग्जचं वितरण किती प्रमाणात झालं असेल? या ड्रग्जच्या विळख्यात किती तरूण-तरूणी सापडले असतील याचा अंदाज बांधणंही तेवढंच अवघड आहे.