यंदाच्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील लक्षवेधी लढतींमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. नणंद विरूद्ध भावजय अशा होत असलेल्या या लढतीमध्ये आता एक नवा ट्वि्स्ट आला आहे. अजित पवार यांचे कट्टर राजकीय विरोधक, शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीतून आपण निवडणूक लढणार असल्याची घोषणा केली आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीत एकत्र असल्याने शिवतारेंच्या भूमिकेवर वारंवार आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे यानंतर विजय शिवतारे काय भूमिका घेणार? याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. अशातच टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे.
विजय शिवतारे शिवसेनेतून बाहेर पडणार का?, असा प्रश्न टीव्ही 9 मराठीने विचारला. तेव्हा त्यावर विजय शिवतारे यांनी मोठं विधान केलं आहे. माझा एकनाथ शिंदे यांचं घनिष्ठ नातं आहे. दोन चार महिने त्यांची अडचण झाली आहे. मला तर लोकसभा निवडणूक लढायचीच आहे. महायुतीत आपल्याला जागा तर सुटणार नाही. त्यांना अडचण आहे म्हणून मी बाहेर पडतोय… 25 वर्षाची सोबत आहे ती असणार आहे ना… मी लोकसभेत विजयी होणार हे दैदिप्यमान यश असेल, असं विजय शिवतारे म्हणाले.
माझ्यावर कारवाई होणार अशी चर्चा होती. बातम्या होत्या. बघू ना काय होते ते… कपोलकल्पित विषयावर बोलणं योग्य नाही. मी लोकसभेला उभा राहणार आणि विजयी देखील होणार… आज हर्षवर्धन पाटलांना भेटणार आहे. शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढवावी आणि जिंकावी. महायुतीत मी विनंती केली आहे. मुख्यमंत्र्यांनी जाग सोडवून घेतली तर मला आनंद होईल, असं विजय शिवतारे म्हणाले.
डिपॉजिट जप्त करणं किंवा निवडून देणं हे जनतेच्या हातात आहे. या अशा लोकांच्या हातात नाही. पगारी लोकांच्या बोलण्यावर लक्ष देण्याची गरज नाही, असं म्हणत अमोल मिटकरी यांच्यावरही शिवतारे यांनी शाब्दिक हल्ला चढवला. काउंटर करायचं म्हणून ते मीडियात बोलतायेत. माझी लढाई ही महाविकास आघाडीशी होईल, असंही शिवतारे म्हणाले.
बारामतीतील लढाई ही सुप्रिया सुळे विरुद्ध विजय शिवतारे होईल. महायुतीत एका पवाराला घ्यायचं आणि दुसऱ्या पवाराला पडायचं… पण लोकांना दोन्ही पण पवार नको आहेत. जनतेची ही मागणी आहे. म्हणून मी निवडणूक लढवतोय. ही लढाई पवार कुटुंब विरुद्ध जनता आहे. पवारांनी पुरंदरचं विमानतळ बारामतीला नेण्याचा प्रयत्न केला. आता जनता या सगळ्याला उत्तर देईल. लोक आता या सगळ्याला उत्तर देतील, असं शिवसातारेंनी म्हटलं