रणजित जाधव, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, शिरूर- पुणे : लोकसभा निवडणूक तोंडावर आहे. अशात आपल्याला तिकीट मिळावं, यासाठी राजकीय नेते फिल्डिंग लावताना दिसतात. अशात कट्टर राजकीय नेत्याने आपल्या राजकीय विरोधकासाठी चक्क तिकीटाची मागणी केलीय. ही बातमी आहे पुण्यातून… शिरूर लोकसभा मतदारसंघात आपल्याच कट्ट्रर विरोधकाच्या तिकीटाची मागणी करण्यात आली आहे. भाजप आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी, शिरूर लोकसभेसाठीचे इच्छुक उमेदवार विलास लांडे यांनी केली आहे. विलास लांडे यांनी ही मागणी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.
आयात उमेदवाराला उमेदवारी देण्यापेक्षा भाजप आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात यावी, अशी मागणीच आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार,शिरूर लोकसभा इच्छुक असलेले विलास लांडे यांनी केली आहे. भाजप आमदार महेश लांडगे हे विलास लांडे यांचे कट्टर विरोधक आहेत. मात्र आता त्यांनीच त्यामुळे आगामी काळात नवं समिकरण शिरूर लोकसभा मतदारसंघात पाहायला मिळणार आहे.
महेश लांडगे हे काम करण्यास तयार असल्याचं त्यांनी म्हटलंय. शिरूर लोकसभेसाठी इच्छुकांची गर्दी झालीय. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील लढण्यास इच्छुक असल्याने विलास लांडे यांनी आक्रमक पवित्रा घेऊन भाजप आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करून थेट अजित पवारांना चक्रव्यूहात अडकवलंय. अजित पवार देखील योग्य तो निर्णय घेतील, असंही लांडे यांनी म्हटलंय.
शिवाजीराव आढळराव पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी देण्यासाठी सकारात्मक असल्याचं बोललं जातंय. अशात भाजपला शिरूर लोकसभेची जागा सोडावी. महेश लांडगे यांना उमेदवारी द्यावी, असं अजित पवार गटाच्या नेत्याने म्हटल्याने चर्चेला उधाण आलं आहे. आमदार महेश लांडगे आणि आमच्यातील शीतयुद्ध संपवून विकासासाठी एकत्र येऊ असंही त्यांनी म्हटलंय. अशात महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांच्या विरोधात कोण उमेदवार असणार हे पाहणं महत्वाचं असेल.