मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, घरात सापडले कोट्यावधींचं घबाड

| Updated on: Aug 21, 2024 | 9:40 AM

मंगलदास बांदल यांची 16 तास चौकशी सुरु होती. या चौकशीनंतर ईडीने बांदल यांना अटक केली. यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

मंगलदास बांदल यांना ईडीकडून अटक, घरात सापडले कोट्यावधींचं घबाड
Follow us on

Mangaldas Bandal Arrest : पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांना ईडीने अटक केली आहे. सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने मंगळवारी मंगलदास बांदल यांच्या शिरूर आणि पुण्यातील निवासस्थानांवर छापेमारी केली होती. यात मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी कोट्यावधी रुपयांचे घबाड सापडले होते. याप्रकरणी ईडीने बांदल यांची चौकशी केली. या चौकशीनंतर ईडीने बांदल यांना अटक केली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

कोट्यावधींचं घबाड सापडलं

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल यांच्या निवासस्थानी मंगळवारी (20 ऑगस्ट) ईडीने अचानक धाड टाकली. मंगलदास बांगल यांच्या शिक्रापूर आणि पुण्यातील हडपसर भागातील महंमदवाडी परिसरात असलेल्या निवासस्थानी ईडीने सकाळी 7 वाजताच कारवाईला सुरुवात केली. या कारवाईत त्यांच्या घरात 5 कोटी 60 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. याशिवाय त्यांच्याकडे पाच अलिशान कार, एक कोटींची चार घड्याळेही जप्त करण्यात आली आहेत.

१६ तासांच्या चौकशीनंतर अटक

ईडीने तब्बल 16 तास कारवाई केली होती. यावेळी मंगलदास बांदल यांची कसून चौकशीही करण्यात आली. तसेच शिक्रापूर येथील घरी बांदल यांच्या पत्नी रेखाताई बांदल, दोन भाऊ आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली. तर, महंमदवाडी येथील बंगल्यात राहत असलेल्या मंगलदास बांदल यांचीदेखील ईडी अधिकाऱ्यांनी चौकशी केली. ईडीच्या या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. आज त्यांना मुंबईच्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.

हे सुद्धा वाचा

लोकसभेसाठी वंचितकडून उमेदवारी

मंगलदास बांदल हे सध्या विधानसभा निवडणुकीसाठी चाचपणी करत होते. बांदल यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळवली होती. मंगलदास बांगल हे शिरूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. पण त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या इंदापूर येथील भाजपच्या मेळाव्याला ते हजर राहिले. त्यामुळे वंचितने त्यांची उमेदवारी रद्द केली. यानंतर बांदल यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा बारामती, तर शिवाजीराव आढळराव यांचा शिरूरमध्ये प्रचार केला होता.

विधानसभेसाठी इच्छुक

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी ते इच्छुक असल्याचे बोललं जात होतं. शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघांमध्ये बांदल स्वतः किंवा त्यांच्या पत्नी उभे करणार असल्याची चर्चा रंगली होती. मंगलदास बांगल हे शिवाजी भोसले सहकारी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी प्रदीर्घकाळ येरवडा तुरुंगात होते. सध्या ते जामीनावर बाहेर आहेत. यापूर्वीही त्यांना ईडीने नोटीस बजावत चौकशीसाठी बोलावले होते. ते चौकशीसाठी हजरही झाले होते. त्यानंतर ईडीने ही कारवाई केली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई झाल्याने पुणे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.