पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) पुण्यात आहेत. येथील पुरोहित वर्गाने राज ठाकरे यांचे स्वागत केले आहे. पुरोहित राज ठाकरेंना आशीर्वाद देत आहेत. पुरोहित (Purohit) राज यांच्या पुण्यातील निवासस्थानी पोहोचले आणि शांती मंत्राचे पठण केले. शंखनादही यावेळी करण्यात आला आहे. मनसेकडून पुण्यात राज ठाकरेंचे स्वागत भव्य करण्यात आले. त्यात कार्यकर्त्यांसह आता पुरोहितवर्गही पुढे आला आहे. राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेमुळे आधीच हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरीमधील सर्व पुरोहित राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले. पुण्यातून औरंगाबादसाठी राज ठाकरे रवाना बोतील. वाटेत वढू बुद्रुक तुळापूर येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीची पूजा करून नंतर राज ठाकरे औरंगाबादकडे (Aurangabad) मार्गस्थ होणार आहेत. दरम्यान, राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना झाले आहेत.
राज ठाकरे औरंगाबादकडे रवाना होण्याआधी पुण्यात त्यांच्या घरी मंत्रोच्चारही होणार आहेत, अशी माहिती मनसेकडून देण्यात आली होती. राज ठाकरे यांच्या पुण्यातील राजमहाल या निवासस्थानी शंभर पुरोहित येणार असल्याचे सांगण्यात आले होते. औरंगाबादच्या सभेपूर्वी या गुरुजींच्या माध्यमातून मंत्रोच्चारासह आशीर्वाद देणार आहेत, त्यासाठी मनसेने पोस्टरही छापले होते. त्या पोस्टरवर हिंदू जननायक आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना शुभाशीर्वाद देण्यासाठी शेकडो गुरूजन, असा मजकूर छापण्यात आला होता तसेच यावर त्याची वेळ आणि पत्ताही देण्यात आला होता. त्याप्रमाणे पुरोहितवर्गाने मंत्रोच्चारात राज ठाकरेंना आशीर्वाद दिले.
राज ठाकरे यांच्यासोबत पुण्यातून 150 गाड्यांचा ताफा असणार आहे. तर सभेसाठी 12 ते 15 हजार मनसैनिक पुण्यातून जाणार आहेत. विशेष म्हणजे अयोध्या येथूनही कार्यकर्ते राज ठाकरेंच्या सभेला येणार आहेत, असा दावा मनसे नेत्यांनी केला आहे. तर राज ठाकरे औरंगाबादला सभेसाठी जाण्यासाठी नगरहून जाणार आहेत. त्यांचे अहमदनगर मनसेकडून छत्रपती शिवाजी पुतळ्याच्या येथे स्वागत केले जाणार आहे. या दौऱ्यावेळी राज ठाकरेंसोबत मनसे कार्यकर्त्यांचा मोठा ताफाही असेल, अशीही माहिती देण्यात आली आहे.